मंगळवार
बेंगलुरूच्या विमानतळावर आमचे विमान उतरले तेंव्हा सकाळचे साडे दहा वाजून गेले होते. बेंगलुरूचा हा नवीन विमानतळ मोठा प्रशस्त व नेटका आहे. पण या विमानतळावर येणार्या उतारूंची मुख्य अडचण काही वेगळीच आहे. हा नवीन विमानतळ शहरापासून 30-40 किलोमीटर तरी अंतरावर आहे. त्यामुळे विमानतळावरून शहरात जायचे म्हणजे एकतर मोठ्या वाहतूक मुरंब्याला तोंड द्यावे लागते आणि दुसरे म्हणजे टॅक्सीचे भाडे 500 ते 600 रुपये तरी द्यावे लागते. विमान प्रवासचे तिकिट 2000 रुपये आणि टॅक्सी भाडे 600 रुपये हे गणित काही पचनी पडत नाही. विमान तळ बांधतानाच त्यापासून ते शहरापर्यंत जलद वाहतुक सेवा कशी देता येईल याचा विचार आपल्याकडचे नियोजक का करत नाहीत? हे एक कोडेच आहे.
ही अडचण लक्षात घेऊन, आम्ही एक प्रशस्त इनोव्हा टॅक्सी आधीपासूनच ठरवून ठेवली असल्याने आम्हाला विमानतळावरून येण्या-जाण्याची काहीच अडचण भासली नाही. ही टॅक्सी व तिचा चालक, पुढचे 5 दिवस, बेंगलुरुच्या विमानतळावर आम्ही परत येईपर्यंत, आमच्या दिमतीस होते. या एकाच गोष्टीमुळे, आमचा एकूण प्रवास अतिशय सुखकर झाला यात शंकाच नाही. आमच्यामधे मी सर्वात ज्येष्ठ नागरिक असल्याच्या नात्याने, चालकाच्या शेजारच्या आसनाचा बहुमान मला मिळाला व दुग्धशर्करा योगाची प्रचिती आली असे म्हटले तरी चालेल. बेंगलुरु शहर गेल्या दहा पंधरा वर्षात अतिशय झपाट्याने वाढले आहे. त्याचबरोबर नवे रस्ते बांधणी पण चालू दिसली. अर्थात स्थानिक लोकांचे या बद्दलचे मत काही मला जाणून घेणे शक्य झाले नाही. पण माझे बेंगलुरुला वास्तव्य होते त्या चाळीस वर्षांपूर्वीच्या काळाच्या मानाने, शहरात खूपच बदल जाणवले. मोठे व प्रशस्त रस्ते, उत्तम बांधणीच्या बसेस या नजरेत भरत होत्या. संपूर्ण शहराच्या बाहेरील बाजूस, एक बहिर्गत वलय रस्ता व त्याच्या थोड्या आत, एक अंतर्गत वलय रस्ता, असे दोन रस्ते शहराच्या बाहेर बांधण्यात आले आहेत. विमानतळ या बहिर्गत वलय रस्त्यावर आहे. त्यामुळे या बहिर्गत वलय रस्त्यावरून येऊन आम्ही अंतर्गत वलय रस्त्यावर आलो व तेथून म्हैसूर कडे जाणार्या रस्त्याला, फारशा वाहतुक मुरंब्याला तोंड न द्यावे लागता, येऊन मिळालो. बेंगलुरुची हवा मात्र अतिशय खराब झाली आहे. चाळीस वर्षांपूर्वीच्या मे महिन्यात, बेंगलुरुचे दिवसाचे कमाल तपमान 30-31सेल्ससच्या पुढे गेलेले मला तरी कधी आठवत नाही. आता मात्र तपमान 37-38 पर्यंत सहजपणे पोचत असावे.मी चाळीस वर्षांपूर्वी याच रस्त्याने एकदा म्हैसूर- बेंगलुरु प्रवास केला होता. त्या वेळेस अगदी छोटेखानी असलेला हा रस्ता आता चार पदरी महा-मार्ग झाला आहे त्यामुळेच बेंगलुरुची उपनगरे मागे टाकल्यावर रस्ता जवळपास रिकामा झाल्यासारखेच वाटू लागले. अनंत काणेकर या लेखकाने कर्नाटकच्या या भूमीचे वर्णन, ‘निळे डोंगर तांबडी माती‘ या शब्दात केले आहे. या शब्दांना साजेसे एक चित्रच आता गाडीच्या काचेच्या खिडक्यांच्यातून माझ्या नजरेसमोर साकारू लागले. रस्त्याला लागूनच असलेली हिरवीगार शेते, त्यात मधून मधून डोकावणारी निलगिरीची झाडे, लाल माती व दूर क्षितिजावर दिसणारे निळसर झाक असलेले डोंगर, एखाद्या पिक्चर पोस्ट कार्ड वर असावे तसेच सगळे दिसत होते. ते दृष्य डोळ्यात साठवत असतानाच डोळ्यावर कधी झापड आली ते उमगलेच नाही.
आम्ही श्रीरंगपट्टणच्या थोडे अलीकडे असताना मला जाग आली. गाडीमधे, सगळ्यांच्याच पोटात आता बहुदा कावळे ओरडत असावेत कारण लंच ब्रेक घेण्याची कल्पना लगेच सर्वानुमते मंजूर झाली. गाडीच्या चालकाने थोडे पुढे एक चांगले रेस्टॉरंट असल्याची माहिती दिली व तिथे थांबण्याचे ठरले. कामत या नावाची रेस्टॉरंट्सची साखळी आता महाराष्ट्रात तरी प्रसिद्ध आहे. आता हे श्रीरंगपट्टणचे कामत महाराष्ट्रातल्या कामतचेच भाऊबंद आहेत की नाहीत ते मला कळले नाही. परंतु या कामत मधले दक्षिण भारतीय जेवण मात्र चविष्ट होते एवढे मी खात्रीने म्हणू शकतो.
श्रीरंगपट्टण मधून गाडी जात असताना तिथला दर्या दौलत महाल, वृंदावन बाग यांच्या नावाच्या पाट्या वाचून, पूर्वी केलेल्या सफरींची आठवण झाली परंतु आम्हाला बराच लांबचा टप्पा गाठायचा असल्याने आम्हाला कोठेही थांबणे शक्यच नव्हते. नाही म्हणायला वाटेत एके ठिकाणी कॉफी डे च्या एका रेस्टॉरंटमधे मस्त कॉफी प्यायला मात्र आम्ही थांबलो.
कुशलनगर नावाचे एक गाव आम्ही पास केले तेंव्हा संध्याकाळचे 5 तरी वाजले होते. या गावापासून पुढे एकदम समोरचे चित्र बदललेच. वाई-पांचगणी यांच्यामधे असलेल्या पसरणीच्या घाटासारखा हळू हळू चढत जाणारा घाट आमची गाडी चढू लागली. आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गर्द झाडी दिसू लागली. सिल्व्हर ओक किंवा साग यांचे सरळ सोट जाणारे वृक्ष व त्यावर चढवलेले व लांबून एखाद्या ख्रिसमस ट्री सारखे दिसणारे काळ्या मिर्याचे वेल हेच दृष्य आता अगदी कॉमन झाले. हा रस्ता पाहून जर कसली आठवण झाली असली तर महाबळेश्वरच्या रस्त्यांची. फक्त हा रस्ता महाबळेश्वरच्या रस्त्यांच्या निदान चौपट तरी रूंद असावा. अर्धा पाऊण तास गेल्यानंतर गाडी मडिकेरी मधे शिरली.
कर्नाटक राज्याच्या नैऋत्य कोपर्यात लपलेला, कूर्ग हा एक छोटासा जिल्हा आहे. पश्चिम घाटाच्या पूर्वेकडील उतारावर हे राज्य असल्याने सर्व भौगोलिक परिस्थिती डोंगराळ व दर्या-खोर्यांनी भरलेली आहे. पण पश्चिम महाराष्ट्रातला उघडा-बोडका व उजाड डोंगराळी भाग येथे नाही. बघावे तिथे गर्द हिरवी गार झाडी बघायला मिळते. उघडे बागडे डोंगर तर बघायलाच मिळत नाहीत. रस्त्याच्या कडेला हिरवी गार झुडपे व वेल आणि त्यावर मधूनच फुललेली सुंदर व चित्ताकर्षक रान फुले. कूर्गमधून प्रवास करताना मन अगदी तृप्त होऊन जाते हे मात्र खरे.
पुढचे पाच दिवस आम्ही राहणार होतो ते आमचे रिसॉर्ट आणखी 5 किलोमीटर तरी पुढे होते. तिथे जाण्यासाठी मडिकेरी गाव क्रॉस करण्याची आम्हाला आवश्यकता होती. मडिकेरी हे गाव वसलेले आहे एका दरीत. त्यामुळे अरूंद, वेडे वाकडे व उंच सखल अशा रस्त्यांचेच प्राबल्य होते. बहुतेक रस्ते सॅन फ्रॅन्सिस्को मधल्या लोम्बार्ट किंवा मोस्ट क्रूकेड स्ट्रीट ची आठवण करून देणारे होते. गावातल्या बहुतेक घरांना मंगलोरी कौलांची लाल चुटुक छपरे असल्याने ती लांबून तरी छान दिसत होती. पण गावात अजून उघडी गटारेच होती आणि एकूण सगळा प्रकार फारसा तरी रोचक वाटला नाही.
गाव सोडल्यावर परत आजूबाजूचे चित्र नयन मनोहर बनले. 5 किलोमीटर पुढे गेल्यावर आमची गाडी एका गेट मधून आत शिरली. समोर दिसत होती केरळी पद्धतीची एक इमारत, झाडांच्या मधे दडलेली.
मध्यभागी एक पाण्याचा छोटासा हौद, चारी बाजूला लाकडी कठडा व त्याच्या मधे मधे बसायला कोच. कठड्याच्या पलीकडेच गर्द झाडी, हात बाहेर काढून स्पर्श करता येईल एवढ्या जवळ. पॅशन फ्रूटच्या रसाच्या पेल्याने आमचे स्वागत करण्यात आले आणि दिवसभराच्या प्रवासाचा ताण तणाव कोठेतरी पळूनच गेला.
8 जून 2010
पश्चिम महाराष्ट्रातला उघडा-बोडका व उजाड डोंगराळी भाग येथे नाही. koni sangitale tumhala ki pashchim maharashtra उघडा-बोडका व उजाड डोंगराळी भाग aahe?????????
ReplyDeleteअमोल-
ReplyDeleteमाझ्या आयुष्यापैकी, 60 पेक्षा जास्त वर्षे, मी पुणे आणि पश्चिम महाराष्ट्र यात घालवलेली असल्याने या भागातले डोंगर कसे दिसतात हे मला कोणी सांगण्याची गरज आहे असे मला वाटत नाही.