(माझ्या ब्लॉगचे एक नियमित वाचक व माझे मित्र श्री. सहज यांनी मला या ब्लॉगपोस्टचा दुवा पाठवला आहे. त्याबद्दल प्रथम त्यांचे आभार. )
या वर्षीच्या 25 फेब्रुवारीला, पपा डॉक किंवा डॉक्टर वॉल्टर वॉटसन यांनी वयाची शताब्दी पूर्ण केली. म्हणजे हा दिवस काही फार निराळ्या पद्धतीने पपा डॉक यांनी घालवला असे मुळीच नाही. नेहमी प्रमाणेच ते सकाळी पावणे सात वाजता उठले, त्यांनी न्याहरी केली व साडे आठ वाजता ते रोजच्या प्रमाणे हॉस्पिटल मधल्या आपल्या कामावर हजर झाले.
विश्वास नाही ना बसत? पण ही सत्य परिस्थिती आहे की हा शतक वीर डॉक्टर अजुनही रोज आपल्या हॉस्पिटलमधे जातो आणि पेशंट्सना सल्ला देतो. अमेरिकेतील जॉर्जिया राज्यातल्या ऑगस्टा येथील युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमधल्या स्त्रियांच्या विभागात, पपा डॉक गेली 63 वर्षे प्रसूतितज्ञ म्हणून कार्यरत आहेत. ते आज पृथ्वीतलावरचे सर्वात वयोवृद्ध प्रसूतितज्ञ आहेत. या 63 वर्षात पपा डॉक यांनी 18000 बालकांची डिलिव्हरी केली आहे.
पपा डॉक यांच्या पेशंट्सची यादी बघितली तर खूप गंमतीदार वैशिष्ट्ये बघायला मिळतात. पपा डॉक यांचे नातू शोभतील अशा वयाचे असलेले, त्यांचे सध्याचे सहकारी डॉक्टर, मायकेल मॅकडॉनो, यांची डिलिव्हरी पपा डॉक यांनीच केली आहे. ते पपा डॉक यांच्याबदल गौरवोद्गार काढताना म्हणतात की पपा डॉक यांचे कामाचे एथिक्स इतके परिपूर्ण आहे की त्यापेक्षा काही जास्त चांगले असूच शकत नाही. 77 वर्षाच्या व याच हॉस्पिटलमधून कार्याधिकारी म्हणून निवृत्त झालेल्या मिसेस सॅब्रा ऍलन या महिला, पपा डॉक यांच्या गेली 59 वर्षे पेशंट आहेत. त्यांची 5 मुले आणि 12 नातवंडे या सर्वांची डिलिव्हरी पपा डॉक यांनीच केली आहे. त्या म्हणतात की पपा डॉक सारखा दुसरा डॉक्टर जगात मिळणारच नाही. ते सर्वोत्तम डॉक्टर आहेत.
पपा डॉक हे दुसर्या महायुद्धाच्या अखेरीस डॉक्टर बनले. त्यानंतर 1947 पर्यंत त्यांनी कोरिया देशात काम केले होते. तेंव्हापासून आजपर्यंत पपा डॉक यांनी ऑगस्टा मधील युनिव्हर्सिटी हॉस्पिटल मधेच काम केले आहे. त्यांच्या या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, या हॉस्पिटलच्या स्त्री विभागाला, डॉक्टर वॉल्टर वॉटसन यांचे नांव दिलेले आहे व या विभागाच्या प्रवेशद्वारापाशी एका नवजात अर्भकाला हातात घेतलेला पपा डॉक यांचा पूर्णाकृती ब्रॉन्झचा पुतळा उभारलेला आहे.
वयाची शताब्दी पूर्ण झाल्यावर पपा डॉकना कोणीतरी निवृत्त कधी होणार? म्हणून विचारले. पण आपला तसा काहीच विचार नसल्याचे त्यांनी लगेच सांगितले. दृष्टी अधू झाल्यावर त्यांनी प्रत्यक्ष डिलिव्हरी करण्याचे बंद केले असले तरी सल्ला देण्याचे काम ते करतच राहणार आहेत. आज पपा डॉक यांना थोडा सांधेदुखीचा त्रास आहे व त्यांची दृष्टी व श्रवणशक्तीही अधू झालेली आहे. परंतु आपली ही कमजोरी आपल्या कामाच्या आड ते कधीच येऊ देत नाहीत. ते म्हणतात की ” मला वैद्यकीय शास्त्र अतिशय प्रिय आहे व माझ्या या कामामुळे माझा लोकांशी जो संबंध येतो त्यामुळे मला काम करत रहावेसे वाटते. मी काम बंद केले तर सकाळी अंथरुणातून उठायला मला काही प्रयोजनच उरणार नाही.”
63 वर्षे नवजात अर्भकांच्या जन्माचे साक्षीदार असलेले पपा डॉक आजही म्हणतात की ” अर्भकाच्या जन्मासारखी दुसरी कोणतीही आश्चर्यजनक गोष्ट या जगात नाही. जीवनाचा हा चमत्कार बघून मी आजही तितकाच आश्चर्यचकित होतो.” पपा डॉकना खेद फक्त एवढाच होतो की आता त्यांना फक्त ज्या केसेसमधे कॉम्लिकेशन्स झाली होती अशाच केसेस चांगल्या आठवतात. बाकी सर्व केसेस आता स्पष्ट आठवत नाहीत.
1 जून 2010
No comments:
Post a Comment