शुक्रवार
आज सकाळी ब्रेकफास्ट झाल्यावर, बच्चे मंडळींनी जाहीरच करून टाकले आहे की ते कोठेही साईट सीइंग करायला येणार नाहीत म्हणून. त्यांना रिसॉर्टच्या फन झोन मधेच खेळायचे आहे. मी त्यांचे मतपरिवर्तन करण्याचा थोडाफार निष्फळ प्रयत्न करून बघतो व लॉस्ट केस म्हणून सोडून देतो. मुले नाहीत म्हणजे त्यांचे आई-बाबा नाहीतच. मग शेवटी आम्हीच ज्येष्ठ नागरिक उरलो, साईट सीईंगला जाण्यासाठी! मडिकेरीच्या जवळच, अबी फॉल्स म्हणून एक धबधबा आहे तो बघायला जाण्यासाठी मग आम्हीच निघतो. या वेळेला जनरल करिअप्पा चौकातून न जाता आम्ही मडिकेरीच्या मंडईच्या बाजूने बाहेर निघतो. हा सर्वच भाग अत्यंत गजबजलेला, गलिच्छ आणि घाणीचे साम्राज्य असलेला असा वाटला. मात्र एकदा गाव ओलांडल्यावर, अतिशय घनदाट झाडी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दिसू लागली. अबी धबधब्याकडे जाणारा रस्ता संपूर्ण उताराचाच आहे, हा धबधबा मडिकेरीपासून जेमतेम 4 किलोमीटरवर आहे. जवळच पार्किंगसाठी मोकळी जागा आहे. तेथून परत बरेच खाली उतरावे लागते. हा सर्व परिसर कचर्याचे साम्राज्य असल्यासारखा होता. प्लॅस्टिकच्या रिकाम्या बाटल्या, कागद, डबे, प्लॅस्टिकच्या पिशव्या यांचेच सगळीकडे प्राबल्य दिसत होते. जरा पुढे गेल्यावर एक पायवाट लागली पायवाटेच्या दोन्ही बाजूंना कॉफीची झाडे होती. असेच काही अंतर गेल्यावर समोर एक हलता पूल दिसू लागला. या हलत्या पुलाच्या समोरच हा अबी धबधबा आहे.
आमच्या मनात या धबधब्याबद्दल जी काही कल्पना होती ती व प्रत्यक्षातला धबधबा यात जमीन अस्मानाचे अंतर निघाले. मी तसे बरेच धबधबे या आधी बघितलेले आहेत. शाळेत असताना गोकाकचा धबधबा व गिरसप्पा मी बघितला होता. अमेरिकेत, नायगारा धबधब्याला मी भेट दिली आहे. अगदी आपल्या जवळचा म्हणजे वरंधा घाटातल्या शिवथर घळीतला धबधबा मी बघितला आहे. नायगारा तर सोडाच पण या धबधब्याची तुलना गोकाक किंवा गिरसप्याशीही करणे कठिण आहे. हा अबी धबधबा, साधारण शिवथर घळीतल्या धबधब्यासारखाच आहे. पाणी बर्याच उंचीवरून खाली येत असले तरी ते टप्या टप्याने येते त्यामुळे निसर्गाचे रौद्र स्वरूप वगैरे काही बघायला मिळत नाही. या धबधब्याचा परिसर साफ ठेवला तर हे एक छान पिकनिकचे स्थान मात्र होईल.
दुपारी 4 च्या सुमारास कॉफीच्या एका मळ्याला भेट द्यायला आम्ही निघालो आहोत. आमच्या बरोबर आणखी दोन तीन फॅमिलीज पण त्यांच्या गाड्यांच्यातून येत आहेत. परत एकदा करीअप्पा चौक आणि वळणावळणाचा उताराचा रस्ता. दहा बारा किलोमीटरवर आमच्या गाड्या एका कॉफीच्या मळ्यामधे येऊन थांबतात. या मळ्याचे मालक श्री. किरण हे स्वत: आम्हाला त्यांचा मळा दाखवणार आहेत. श्री. किरण यांना स्वाभाविकच कॉफीच्या लागवडीबद्दल अफाट माहिती. आहे. माझी कॉफी बद्दलची माहिती, या बिया एक झाडाला येतात इतकीच असल्याने या सर्व गोष्टी अगदी नवीन आहेत. श्री. किरण प्रथम आम्हाला सहसा बघायला न मिळणारी अशी झाडे दाखवतात.
ऍव्हॅकॅडो
व्हॅनिला वेल
ऍव्हॅकॅडो हे पेरूसारखे फळ मला खूप आवडते. त्याच्या गराची पेस्ट करून ती टॅको किंवा एन्चिलाडा सारख्या मेक्सिकन डिशेस बरोबर खायची असते. सबंध फळ निखार्यावर भाजून त्यातला गर खायला खूम छान लागतो. या ऍव्हॅकॅडोचे झाड व त्यावर लटकणारी फळे बघणे हे आपल्या देशात तरी दुर्मिळच्. श्री. किरण यांच्या मळ्यावर असे झाड आहे. नंतर दालचिनीचे झाड ते आम्हाला दाखवतात. या झाडाची पाने जरी चुरगळली तरी दालचिनीचा वास येतो. यानंतर व्हॅनिलाचे वेल आम्हाला बघायला मिळाले. या वेलांपासून व्हॅनिलाच्या शिरा बनवण्याची पद्धत अतिशय क्लिष्ट आहे. सध्या सर्व व्हॅनिला सुगंध हा झाडांपासून न बनवता पेट्रोलियम ऑइल मधल्या खाली उरलेल्या कोल टार पासून बनवला जातो ही एक नवीनच माहिती मिळाली. या नंतर आम्ही कॉफीच्या मळ्याकडे वळतो. भारतात 3 लाख टन कॉफी बियांचे उत्पादन होते. त्यातले 1.20 लाख टनाचे उत्पादन एकटा कूर्ग जिल्हाच करतो. या 3 लाख टनांपैकी 2 लाख टन कॉफी तर निर्यातच होते. श्री. किरण यांच्या मताप्रमाणे कॉफीचे झाड खरे म्हणजे कोठेही वाढू शकते. परंतु अशा झाडाला फळे येण्याची शक्यता कमीच असते आणि फळे आली तरी त्यांना तो कॉफीचा दरवळणारा सुगंध जात्या नसतोच. अशा पिकलेल्या फळांना कोणताच वास नसतो. ही कॉफीची फळे उन्हात वाळवून सुकवली जातात. या सुकवण्याच्या कालात त्या ठिकाणचे हवामान, आर्द्रता यावर वाळलेल्या कॉफी फळातील बियांचा सुगंध अवलंबून असतो. भारतात लागवडीखाली असलेली, अरेबिका व रोबस्टा ही दोन्ही प्रकारची झाडे श्री. किरण दाखवतात. अरेबिका कॉफीचे झाड नाजुक असते. त्याची काळजी ही जास्त घ्यावी लागते. रोबस्टा झाड नावाप्रमाणेच मजबूत असते.
पुढे असलेले झाड अरेबिका मागची रोबस्टा
कॉफीच्या मळ्याची चक्कर झाल्यावर गरमागरम कूर्ग कॉफी आणि बिस्किटे आमची वाट बघत आहेत. या कॉफीची लज्जत काही न्यारीच लागते आहे. या नंतर श्री. किरण आम्हाला एका ग्रीन हाऊस मधे घेऊन जातात. ऍन्थुरियम(Anthurium) या फुलझाडाची ते करत असलेली लागवड बघण्यासाठी. या झाडाची रोपे आयातच करावी लागतात. पण फुलांना बरीच किंमत येते व फुले महिनाभर तरी टिकत असल्याने हा धंदा फायद्याचा ठरत असावा.
कूर्ग़ कॉफीची मस्त चव डोक्यात भिनलेली असतानाच आम्ही रिसॉर्टवर परत येतो. आता सगळ्यांनाच परतीचे वेध लागले आहेत. उद्या सकाळी परत एकदा बेंगलुरू पर्यंतचा प्रवास इनोव्हाने आणि त्यानंतर किंगफिशरचे विमान.
कूर्गचे दिवस तर संपूनच गेले आहेत.
19 जून 2010
No comments:
Post a Comment