Tuesday, November 22, 2011

The Great Betrayal Part II

A tripartite meeting of the British administration in India and representatives of Tibet and China was held in 1913 at Shimala in India. A draft treaty was agreed upon during this meeting. This agreement is known as Shimala treaty. According to the terms of this treaty, the relationships and borders between these three countries, nbamely India, Tibet and China, were fixed and agreed upon. However, even though the Chinese representative attending the meeting, Mr. Ivan Chen had initialed the draft treaty, he refused to put his countries official seal on the paper. Subsequently, the Government in Beijing declared that this treaty was unacceptable to China. According to representatives of India and Tibet, since the treaty was mainly about the relationships and the borders between two sovereign countries, India and Tibet, they believed that the Chinese representative had merely attended  the meeting as an observer and his approval or disapproval had no bearing on the proceedings of the treaty. Eventually another meeting was held in July 1914 between representatives of India and Tibet and the draft treaty was finally approved, initialed and sealed.

Quantcast
1913 या साली, ब्रिटिश भारत, तिबेट व चीन या तीन देशांच्या प्रतिनिधींची शिमला येथे एक बैठक झाली. या बैठकीच्या अखेरीस एका कराराच्या मसुद्याला मान्यता देण्यात आली. हा करार शिमला करार म्हणून ओळखला जातो. या करारान्वये, भारत, तिबेट व चीन या तिन्ही देशांच्या मधल्या परस्पर संबंधाचे स्वरूप व सीमा निश्चित करण्यात आली. या कराराच्या कागदपत्रांवर, चिनी प्रतिनिधी इव्हान चेन याने आपले हस्ताक्षर तर केले परंतु आपल्या देशाचा अधिकृत शिक्का उठवण्यास मात्र नकार दिला. या नंतर, बिजिंगच्या चिनी सरकारने, हा करार आपल्याला अमान्य असल्याचेच जाहीर करून टाकले. ब्रिटिश व तिबेटी प्रतिनिधी यांच्या मते हा करार, मुख्यत्वे तिबेट आणि भारत यांच्यामधला असल्याने, चीन देशाचा प्रतिनिधी केवळ एक निरिक्षक या नात्याने हजर होता व त्याची मान्यता किंवा अमान्यता याला फारसे काही महत्व नव्हते. त्यामुळे मार्च 1914 मधे परत एकदा ब्रिटिश व तिबेटी प्रतिनिधींची बैठक झाली व त्यात मान्य करण्यात आलेल्या भारत-तिबेट सीमेच्या नकाशावर, दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी सही व शिक्कामोर्तब केले. 1913-1914 मधल्या या दोन्ही करारांची वैधता, हा खरे तर भारत-तिबेट किंवा आता भारत-चीन सीमा विवादातील प्रमुख तांत्रिक मुद्दा आहे. परंतु त्या बाबत आपण नंतर विचार करू.


शिमला करारात जी भारत-तिबेट सीमा निश्चित करण्यात आली त्यात, लडाखच्या पूर्वेला, काराकोरम पर्वत श्रुंखला व तिबेट मधील कुन लुन पर्वत श्रुंखला याच्यामधे असलेला व अक्साईचिन या नावाने ओळखला जाणारा, 14380 वर्ग मैल आकाराचा भूप्रदेश, भारतीय म्हणून दाखवला गेला होता. या आधीच्या नकाशांमधे सुद्धा हा भाग भारतीय म्हणूनच दर्शवला जात होता.


1908 मधला भारताचा नकाशा
हा भाग कश्मिर संस्थानाचा एक भाग म्हणून नकाशावर दाखवला जाण्यापूर्वी लंडन मधल्या व्ह्यूहात्मक योजकांचे मत हा भाग ब्रिटिश भूभाग म्हणूनच ठेवावा असे होते. परंतु नंतर काही कारणांनी हा भाग कश्मिर संस्थानाचा एक भाग म्हणून नकाशावर दाखवला जाऊ लागला. कश्मिर संस्थानाचे स्वत:चे असे पोलिसदल असल्याने स्वाभाविकच त्यांच्याकडे या सीमेच्या संरक्षणाची जबाबदारी देण्यात आली.
लडाख मधून अक्साईचिन मधे प्रवेश करण्याचे मार्य (निळ्या रंगातले)
अक्साईचिनचा भाग भारतीय म्हणून जरी नकाशात दाखवला जात असला तरी प्रत्यक्षात हा भूभाग व लडाख हे काराकोरम पर्वतराजीने पूर्णपणे अलग केलेले प्रदेश होते. त्यामुळे या प्रदेशात, लडाख मधून प्रवेश करण्यासाठी, फक्त तीन मार्ग उपलब्ध होते. यातला एक मार्ग लेहपासून निघून खार्डून्ग खिंड- लोअर शोयोक नदीचे खोरे- नुब्रा नदीचे खोरे- टुलुमपुटी नदीचे खोरे- सासेर खिंड- मुर्गो- अपर शोयोक नदीचे खोरे या मार्गे काराकोरम खिंडीजवळच्या चिपचॅप नदीच्या जवळ अक्साईचिनला पोचत होता. दुसरा मार्ग लेह- चॅन्ग खिंड- पॉन्गॉन्ग सरोवर- मार्सिमिक खिंड- हॉट स्प्रिंग्स या मार्गाने चॅन्ग- चेन्मो नदीच्या जवळ असलेल्या कोन्गा खिंडीजवळ होता तर तिसरा मार्ग लेहहून निघून सिंधू नदीचे खोरे- डुन्गटी- त्साका खिंड मार्गे चुशुल गावाजवळ असलेल्या पॅनगुर सरोवराजवळच्या युला खिंडीमधून होता. हे तिन्ही मार्ग अतिशय दुर्गम व जिकिरीचे तर होतेच पण या मार्गांनी अक्साईचिन पर्यंतचा प्रवास करणे फक्त उन्हाळ्यातल्या 3,4 महिनेच शक्य होते. या कारणांमुळे कश्मिर पोलिसांच्या तुकड्या मुख्यत्वे लेह मधेच मुक्काम ठोकून असत व उन्हाळ्याच्या महिन्यांमधे या भागात टेहेळणी पथके पाठवत असत.
1947 नंतर कश्मिर पोलिसांची ही जबाबदारी, ITBP (India Tibet Border Police) या तुकडीकडे देण्यात आली. या तुकडीने अपर शोयोक नदीच्या खोर्‍यात सासेर ब्रॅन्ग्सा आणि सुलतान चुक्सु या दोन ठिकाणी, सीमेजवळील दौलत बेग ओल्डीडेमचोकया ठिकाणी आणि चॅन्ग-चेन्मो नदीच्या जवळ असलेल्या कोन्गका खिंडीजवळच्या हॉट स्प्रिंग्स येथे ITBP ठाणी बसवली. दौलत बेग ओल्डी व चुशुल या दोन्ही ठाण्यांजवळ विमाने उतरतील अशा धावपट्याही बनवल्या गेल्या.
ITBP  च्या 1959 च्या आधीच्या पोलिस चौक्या
असे मानले जाते की 1950च्या दशकात चीनने अक्साईचिन या भारतीय प्रदेशातून जाणार्‍या शिंचियांग-तिबेट रस्त्याच्या बांधणीचे काम भारताच्या नकळत केले होते. परंतु ही गोष्ट सत्यास धरून असल्याचे वाटत नाही. 1952 च्या उन्हाळ्यात भारतीय पायदळाच्या दोन रेजिमेंट्स, Kumaon Regiment आणि Laddakh Militia यांच्यातील दोन अधिकारी कॅप्टन आर. नाथ व कॅप्टन सूरी व एक सैनिक तुकडी यांना टेहेळणी करण्यासाठी अक्साईचिन भागात पाठवले गेले होते. हे अधिकारी व त्यांच्या बरोबरचे सैनिक वर निर्दिष्ट केलेल्या कोन्गा खिंडीतून अक्साईचिन मधे तिबेटच्या सीमेवर असलेल्या कनक खिंडीपर्यंत गेले असताना व तेथील भागाची टेहेळणी करताना, त्यांना एक धक्कादायक बातमी तिथे गुरे चारणार्‍या गुराख्यांकडून समजली होती. या बातमीप्रमाणे, चिनी इंजिनीअर या भागात रस्ता बांधण्यासाठी सर्व्हे करत होते. PLA किंवा चिनी सैन्याच्या कोणत्याही तुकड्या तेंव्हा अक्साईचिन मधे नव्हत्या. या कामगिरीबद्दल या दोन्ही अधिकार्‍यांना व सैनिकांना प्रशस्तिपत्रके मिळाली होती पण त्यांचा अहवाल मात्र गुप्तपणे ठेवण्यात येऊन त्याच्यावर कोणतीही कार्यवाही झाली नव्हती. कल्पना करा जर त्या वेळी भारताने तेथे सैन्य पाठवून कनक खिंडीजवळ एक तळ उभारला असता तर पुढचा सर्व प्रश्नच मिटला असता आणि सीमा विवादाचे चित्र काही निराळेच दिसले असते.
कॅप्टन नाथ व सुरी यांनी टेहेळणी केलेला भाग
दुर्दैवाने भारत सरकारला या वेळी चीनबद्दल बंधूप्रेमाचे भरते आले होते व त्याच्यामुळे चीनच्या या सर्व इराद्यांच्याकडे भारत सरकारने पूर्ण दुर्लक्ष करण्याचे ठरवले. 1955 सालापर्यंत कनक खिंडीच्या पश्चिमेच्या भागावर चिनी सैनिकांनी पूर्ण जम बसवला होता. 1957 मधे चीनने रस्ता चालू केल्याची घोषणा केली आणि त्याच वेळी अक्साईचिन हा चीनचा भाग असल्याचेही घोषित केले. यावेळी भारतीय पायदळाचे प्रमुख जनरल थिमय्या यांनी अक्साईचिन मधे मोहीम चालू करण्यासाठी सरकारची परवानगी मागितली होती परंतु तेंव्हाचे संरक्षण मंत्री कृष्ण मेनन यांनी, चीन हा भारताचा सच्चा मित्र असल्याचे सांगून ही परवानगी नाकारली होती.
1958च्या उन्हाळ्यात भारतीय पायदळाने कनक खिंडीच्या भागात पाठवलेल्या दोन तुकड्यांना चिनी सैनिकांनी कैद करून अतिशय अपमानास्पद वागणूक दिली होती व नंतर सोडून दिले होते. याच वर्षीच्या शरद ऋतुपर्यंत चिनी सैन्याने चुशुल जवळच्या पॅनगॉन्ग सरोवराजवळचा भाग व तेथे असलेल्या खुनार्क किल्यावर आपला ताबा प्रस्थापित केला होता. हा भूभाग अक्साईचिनच्या प्रदेशाच्या बाहेर होता व हे भारतीय सीमेचे स्पष्ट उल्लंघन होते.
तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या आदेशांप्रमाणे चीनचे हे सर्व उद्योग भारतीय जनतेसमोर कधीच आले नाहीत. नेहरू व चिनी पंतप्रधान चौ-एन-लाय यांच्या पत्रव्यवहारातून ही गोष्ट आता उघड झाली आहे. चीनच्या दृष्टीने भारताने पाळलेली ही गुप्तता त्यांच्या पथ्यावरच पडत होती.
1959 मधे अशा दोन घटना घडल्या की नेहरूंना आपला चीनबद्दलचा दृष्टीकोन चुकीचा आहे असे वाटू लागले. यातली प्रथम घटना म्हणजे तिबेट मधे झालेला उठाव व दलाई लामांनी भारतात घेतलेला आश्रय. या घटनेनंतर भारत सरकारचे अधिकारी भारताने चीनबद्दल घेतलेल्या कमकुवत धोरणाबद्दल व त्यामुळे भविष्यात येणारे प्रश्न यावर उघडपणे शंका व्यक्त करू लागले होते. व भारताने सीमांच्या संरक्षणासाठी जास्त कडक पावले उचलण्याची गरज व्यक्त करू लागले होते. भारताचा एकूण सूर नरमाईचा राहिलेला नाही हे बघितल्याबरोबर चीनने सीमेवरच्या आपल्या सर्व ठाण्यांच्यावर सैनिक तुकड्या आणणे, रणगाडे व तोफखाने हलवणे, रस्त्यांचे जाळे व जलद रसद पुरवता यावी या दृष्टीने इतर पावले उचलून स्वत:ची स्थिती पूर्ण मजबूत केली होती.सीमेवरील भारताच्या बाजूला मात्र अजून सीमांचे रक्षण पोलिस दलेच करत होती. रस्ते वगैरे बांधलेले नसल्याने रसद पुरवण्याचे कार्य मुख्यत्वे खेचरांच्या मार्फतच होत होते.
1959 मधे दुसरी अशी घटना घडली की ज्यामुळे भारतातल्या जनतेसमोर चीनबरोबरच्या सीमांच्यावर काय चालले आहे याची सत्य परिस्थिती प्रकाशात आली व भारत सरकारने याबाबत घेतलेला बुरखा संपूर्ण रित्या फाटला. ही घटना कोन्गका खिंडीतील दुर्घटना‘ (The Kongka Pass incident:) या नावाने आता ओळखली जाते. या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात चिनी सैन्य एवढे धीट झाले होते की त्यांनी चुशुलच्या धावपट्टीपर्यंत पुढे येऊन एका भारतीय पोलिसांच्या तुकडीवर हल्ला करून त्यांना कैद केले. ही पोलिस तुकडी चिनी सैन्याच्या कैदेत ऑक्टोबरच्या सुरवातीपर्यंत होती. त्या वेळेस पार सीमेपर्यंत ITBP ची दले गस्त घालत असत. भारत सरकारने ही गस्त ताबडतोब बंद करण्यात यावी असा आदेश काढून आपण शेपूट घालण्यात किती वाकबगार आहोत हे चिनी सैन्याला दर्शवून दिले व त्यांचे मनोधैर्य आणखीनच उंचावण्यास मदत केली.
DSP करमसिंह
या दरम्यान एक ITBP पोलिस अधिकारी DSP करमसिंह यांना, गृह मंत्रालयाच्या एका उप-संचालकाकडून एक आश्चर्यजनक ऑर्डर आली की त्यांनी ताबडतोब चीनच्या लडाखमधल्या ताबारेषेपर्यंत जाऊन तेथे भारतीय ठाणी प्रस्थापित करावीत. या ऑर्डरमधे असेही म्हटले होते की असे पहिले ठाणे कोन्गा खिंडी जवळच्या हॉट स्प्रिंग्स येथे बसवण्यात यावे. कॅप्टन नाथ व कॅप्टन सूरी यांनी सात वर्षांपूर्वी केलेल्या कनक खिंडीच्या मोहीमेच्या रस्त्यावरच हॉट स्प्रिंग्स ही जागा होती. फक्त आता फरक एवढाच होता की स्वयंचलित बंदुका व मशीन गन्स, तोफा सारख्या शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेल्या व अतिशय उच्च मनोधैर्य असलेल्या चिनी सैन्याच्या मजबूत स्थानासमोर, दुसर्‍या महायुद्धाच्या वेळच्या 303 बोल्ट रायफल्स फक्त जवळ असलेल्या या पोलिस दलाला, हे पोलिस ठाणे प्रस्थापित करायचे होते. DSP करमसिंह यांना या मोहीमेसाठी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या 40 जवानांचे दल व या दलाचे प्रमुख DSP एस.पी. त्यागी हे मदतीसाठी देण्यात आले होते. एकूण 60 लोकांची हे पोलिस दल ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात लेहहून निघाले व लेह- चॅन्ग खिंड- पॉन्गॉन्ग सरोवर- मार्सिमिक खिंड या मार्गाने चॅन्ग- चेन्मो नदीच्या जवळ असलेल्या हॉट स्प्रिंग्स या स्थानाजवळ आले. चिनी सैन्याची या भागातली ठाणी कोठे आहेत याची या दलाला काहीच कल्पना नव्हती. हॉट स्प्रिंग्सला कॅम्प ठोकल्यावर दुसर्‍या दिवशी म्हणजे 20 ऑक्टोबरला, DSP करमसिंह यांनी 3 जणांच्या एका तुकडीला पूर्वेच्या बाजूला टेहेळणी करून चिनी सैन्याची ठाणी कोठे आहेत याचा अंदाज घेण्यासाठी पाठवले. संध्याकाळी नियुक्त वेळेपर्यंत ही तुकडी न परतल्याने हे पोलिस कदाचित रस्ता चुकले असतील या कल्पनेने DSP करमसिंह यांनी 10 पोलिसांची एक तुकडी मदतीसाठी पाठवली. हे तुकडी रात्री 11 वाजता परतली मात्र पहिल्या 3 पोलिसांच्या तुकडीचा काहीच पत्ता लागू शकला नव्हता. मात्र 10 किलोमीटर अंतरावर त्यांना घोड्यांच्या खुरांचे ठसे मातीत आढळले होते व या वरून चिनी सैनिक या भागात असावेत असा अंदाज बांधता येत होता.
हॉट स्प्रिंग्स मधली भौगोलिक परिस्थिती
पुढच्या दिवशी DSP करमसिंह व त्यागी हे 20 पोलिसांच्या एका तुकडीसह घोड्यांवर बसून पुढे निघाले व बाकी पोलिसांना त्यांनी मागून पायी येण्यास सांगितले. काल घोड्याच्या खुरांचे ठसे सापडले होते तेथे त्यांना परत ठसे दिसले. ते बघितल्यावर करमसिंह यांनी मागील दल येईपर्यंत थांबण्याचा निर्णय घेतला. सर्व दल एकत्र आल्यावर करमसिंह यांनी 20 जणांच्या तुकडीसह पुढे जाण्याचा निर्णय घेतला व त्यागी यांना आपल्यावर नजर ठेवण्यास सांगितले. थोडे पुढे गेल्यावर मुख्य तुकडी एक खडकामुळे त्यांच्या दृष्टी आड झाली. या वेळेसच अचानक समोरच्या उंचवट्यावर त्यांना एक चिनी अधिकारी दिसला. त्याने DSP करमसिंह यांना शरण येण्यास सांगितले. त्या चिनी अधिकार्‍याला प्रत्युत्तर म्हणून DSP करमसिंह यांनी खालची मूठभर माती आपल्या छातीला लावली व ही जमीन भारताची असल्याबद्दल सांगितले. करमसिंहांच्या या कृतीला नंतर भारतीय वर्तमानपत्रांच्यात प्रचंड प्रसिद्धी मिळाली. थोड्या वेळ खाणा खुणा झाल्यावर तो चिनी अधिकारी खंदकात नाहीसा झाला व क्षणार्धात कर्म सिंह व त्यागी यांच्या दोन्ही तुकड्यांवर चिनी मशीन गन्स व उखळी तोफांमधून अग्नीवर्षाव सुरू झाला. दुसर्‍या बाजूला एका असलेल्या उंचवट्यावरूनही चिनी सैन्याने आग पाखडण्यास सुरवात केली. जुनाट 303 रायफल्सनी हे 20 पोलिस या चिनी सैन्याचा उघड्यावरून समाचार घेऊ लागले. संध्याकाळपर्यंत करमसिंहांच्या 20 पोलिसांपैकी 10 पोलिस मृत्युमुखी पडले. आता शत्रूचा सामना करणे अशक्य आहे हे कळल्यावर DSP करमसिंह शेवटी चिनी सैन्याला शरण गेले. त्यागी यांच्या मोठ्या दलाला मागे जाण्यास चिनी सैन्याने भाग पाडले. DSP करमसिंह व त्यांचे उरलेले पोलिस यांचा अनन्वित छ्ळ करून त्यांना 12 दिवसांनंतर चिनी सैन्याने सीमेवर सोडून दिले, त्याच प्रमाणे उरलेले पोलिस व मृत पोलिसांचे देह परत केले. चिनी ताबा रेषेवरून हे मृत देह नेण्यास फक्त 10 पोलिसांना चिनी सैन्याने परवानगी दिली. या प्रसंगाचे वर्णन करताना एक पोलिस सोनम वांग्याल याने लिहून ठेवले आहे की
Even while we were collecting the bodies, Chinese women in uniform were clicking photographs. The Chinese soldiers were wrapped in snow-white warm clothing and snow-boots while were in our woolen Angora shirts and jerseys, bearing the brunt of the biting cold at that prohibitive height of 16,300 feet.”
मृत्युमुखे पडलेले ITBP चे पोलिस
हॉट स्प्रिंग्स मधील या घटनेची माहिती, दिल्लीला व भारतात एखाद्या बॉम्ब स्फोटासारखी पसरली. देशाचे संरक्षण मंत्री कृष्ण मेनन व भारत सरकार यांच्याबद्दल कमालीचा असंतोष पसरला. कृष्ण मेनन यांना पदच्युत करावे म्हणून रस्त्यावर आंदोलने झाली. संपूर्ण देशात, चीन बद्दल संपूर्ण विरोधी वातावरण निर्माण झाले. हे वातावरण आज 60 वर्षांनंतरही त्याच तीव्रतेने लोकांच्या मनात आहे. नेहरूंनी भारत आपल्या पूर्ण शक्तीसह चीनचा सामना करील अशा घोषणा केल्या. अर्थातच ज्या लोकांना प्रत्यक्ष परिस्थितीची जाणीव होती त्यांना नेहरूंच्या या घोषणांमधला फोलपणा लक्षात आल्याशिवाय राहिला नाही.
व्ही.के.कृष्ण मेनन व जवाहरलाल नेहरू
दिल्लीमधे पायदळाच्या प्रमुखांनी, गृह मंत्रालयाची हे असले मूर्ख साहस केल्याबद्दल चांगलीच कान उघाडणी केली. शेवटी बरीच चर्चा होऊन 1 नोव्हेंबर पासून सैन्याने सीमेच्या रक्षणाचे कार्य आपण हातात घेत असल्याची घोषणा केली. या बरोबरच पायदळ आता सीमेवर पुढे ठाणी उभारण्याचे काम हातात घेईल असेही घोषित करण्यात आले. नेहरूंची हीच ती प्रसिद्ध Forward Policy होती. या धोरणाला प्रत्युत्तर म्हणून चीनने अशी घोषणा केली की जर भारतीय सैन्य लडाखमधे उतरले तर चिनी सेना इशान्येला मॅकमोहन रेषेच्या दक्षिणेला उतरेल.
थोडक्यात म्हणजे पुढच्या नाटकासाठी रंगमंचाची सज्जता झाली होती. आता प्रत्यक्ष नाटकाला फक्त सुरवात व्हायची होती. ते नाटक 1962 मधे सुरू झाले.
14 नोव्हेंबर 1959 ला हॉट स्प्रिंग्स येथे सर्व मृत पोलिसांवर अग्नी संस्कार करण्यात आले. 1962 मधे या ठिकाणी एक स्मारक उभारण्यात आले. भारताच्या सर्व राज्यामधली पोलिस दले या स्मारकाला एखाद्या देवस्थानाप्रमाणे मानतात. DSP करमसिंह हे भारताचे नवे हीरो बनले. त्यांना राष्ट्रपतींचे सुवर्ण पदक नेहरूंच्या हस्ते देण्यात आले. सरकार आणि नेतेमंडळी यांच्या कणाहीन व दुबळ्या वर्तनाच्या पार्श्वभूमीवर, DSP करमसिंह यांचे धैर्य व त्यांनी चिनी सैन्यासमोर माती भरलेली मूठ स्वत:च्या छातीला लावण्याची कृती हे दोन्ही भारतातील जनतेला प्रचंड अपील झाले यात शंकाच नाही.
हॉट स्प्रिंग्ज येथील पोलिस स्मारक
लडाख व अरुणाचल प्रदेश यातील सीमांवरचा भारतीय सैन्याचा ताबा व नेहरूंची Forward Policy या मधून पुढे काय निष्पन्न झाले हे पुढे पाहू.
1 ऑगस्ट 2010

No comments:

Post a Comment