Friday, December 2, 2011

Singapore Revisited

Quantcast
I have landed on  Singapore's Changi airport after almost an year. Since I would be here for next few months, I have closed down completely my household in India. The first thing that strikes me at Changi airport is that everything is just about same as it was an year ago. This is as if, I have just made a short day trip out of Singapore and I am back. What is true about Changi, is also true about Singapore in general and I am not writing only about Coffee stalls and amenities at the airport. If I leave my home town Pune in India, even for a fortnight or a month, I always notice some changes or other, when I return. At least I find some road newly dug up or some changes in traffic pattern made by police. If that does not happen, at least the weather would have changed in my absence. If its sunny when I leave my city, it would surely be raining when I return. If it is bitter cold when I leave, it would be hot on return. Nothing of the sort ever happens in Singapore. The Sunlight is always harsh and every afternoon it always rains with thunder. I always feel that in Singapore, dates, months, or even seasons have no real relevance as the weather in all months of the year or the seasons is just the same.काही महिन्यांसाठी का होईना, पुण्यातला गाशा गुंडाळून मी सिंगापूरच्या विमानतळावर उतरलो आणि एकदम लक्षात आले की अरे! इथे तर काहीच बदललेले नाही. सगळे वर्षभरापूर्वी जसे होते तसेच आहे. मी एखादा दिवस जरी सिंगापूरच्या बाहेर जाऊन परत आलो असतो तरी जसे परत सगळे दिसले असते तसेच या वर्षभराच्या कालावधीनंतरही दिसते आहे. अर्थात मी काही विमानतळावरच्या सोई, सुविधा किंवा कॉफी स्टॉल्सबद्दल न बोलता एकूणच सिंगापूरमधल्या परिस्थिती बद्दलच बोलतो आहे.
पुण्याला तुम्ही आठ पंधरा दिवस जरी बाहेर गावी जाऊन आलात तरी काही ना काही तरी बदल हा जाणवतोच. बाकी काही नाही तरी घराजवळचा कुठला तरी रस्ता नवीन खणलेला असतो किंवा ट्रॅफिक पोलिसांनी कोणता तरी रस्ता, नवीनच एक दिशा मार्ग केलेला असतो किंवा निदान हवामान तरी बदललेले असते. जाताना कडक ऊन्हाचे दिवस असले तर परत आल्यावर पाऊस सुरू झालेला असतो. जाताना कडाक्याची थंडी असली तर परत आल्यावर चक्क उकडत असते. इथे सिंगापूरमधे तसे काहीच होत नाही. ऊन कोवळे वगैरे कधी नसतेच. ते कडकच असते. कानठळ्या बसवणार्‍या मेघगर्जनेसहच दुपारी पाऊस पडतो. सिंगापूरमधे कॅलेंडर, तारीख वगैरे गोष्टींना तसे फारसे काहीच महत्व नसते. सगळे ऋतू सारखेच म्हटल्यावर जानेवारी काय? जून काय? किंवा ऑक्टोबर काय? कोणत्याही महिन्याचे हवामान तसेच असते.
काल सकाळी माझा आवडता स्ट्रेट टाईम्स उघडला. या वर्तमानपत्राचे वैशिष्ट्य म्हणजे यात येणारे अग्रलेख किंवा इतर लेख. ते वाचायला मला खूप आवडतात. बाकी या वर्तमानपत्राला वृत्तपत्र म्हणण्यात काहीच अर्थ नसतो कारण सिंगापूरमधे काही घडतच नसल्याने बातम्या तरी कशाच्या देणार? इथले राजकारणी हे तोडून टाकू! ते तोडून टाकू! वगैरे काही म्हणतच नाहीत. अपघात वगैरे क्वचितच होतात. देशात सगळीकडे आबादी आबादी असल्याने सरकारने अमूक किंवा तमूक करायला पाहिजे असे कोणी म्हणतच नाहीत. नाही म्हणायला कालच्या पेपरात लसणीच्या कांद्यांचे भाव वर गेल्याचे वृत्त वाचले. अर्थात याचा सरळ संबंध चीनमधल्या लसणीच्या पिकाशी जोडला जातो. सिंगापूरमधे कसलेच पीक येत नसल्याने इथल्या शेतकर्‍यांचे कसे नुकसान झाले वगैरे काही म्हणण्यासारखेच नसते. स्थानिक बातम्याच नसल्याने इथल्या वर्तमानपत्रात जगभरच्या बातम्या येतात. त्यात चीन बद्दलच्या जरा जास्तच प्रमाणात असतात. याचा अर्थ सिंगापूर चीन धार्जिणे आहे असा कोणी काढू बघेल तर तो चुकीचा आहे. इथले 70 % लोक मूळ चिनी वंशाचे असल्याने त्यांना चीन मधे काय घडते आहे याबद्दल कुतुहुल असते एवढेच.
काल दुपारी जेवायला जवळच्याच फूड कोर्ट मधे गेलो होतो. घरी स्वैपाक करायचा कंटाळा आला की सिंगापुरी मंडळी फूड कोर्ट मधे जातात. फूड कोर्ट म्हणजे एक प्रशस्त हॉल असतो. त्यात चांगली शंभर दोनशे टेबले व खुर्च्या मांडलेल्या असतात. हॉलच्या सर्व भिंतीच्या कडांना चिनी, जपानी, इंडोनेशियन, थाई, कोरियन व भारतीय खाद्य पदार्थ मिळण्याचे स्टॉल असतात. खाद्य पदार्थ बंद काचेच्या आड मांडून ठेवलेले असतात. आपल्याला पाहिजे ते घेऊन यायचे व त्यावर मनसोक्त ताव मारायचा. या शिवाय सर्व प्रकारची पेये व गोड घाशांसाठी गोड पदार्थ असतातच. फूड कोर्ट मधे पदार्थांच्या किंमती तशा माफक असल्याने सर्व कुटुंब सहजपणे मनसोक्त जेवू शकते.
फूड कोर्ट मधून परत येत असताना मात्र एक अघटित घटना घडली. या फूड कोर्टच्या बाजूला असलेल्या एका ग्रोसरी दुकानात जात असताना सबवे कडे जाणारा सरकणारा जिना एकदम बंद पडला. हे दुकान प्रत्यक्षात एका मेट्रो स्टेशनच्या खाली असल्याने मेट्रो ट्रेनचीच वीज गेली असणार हे उघड होते. आश्चर्य व्यक्त करीतच घरी आलो. संध्याकाळच्या बातम्यांच्यात सनसनाटी ठळक बातमी हीच होती की केबल फॉल्ट मुळे 15 मिनिटे मेट्रो कशी बंद पडली व त्यामुळे लोकांच्यावर कसा दुर्धर प्रसंग ओढवला वगैरे वगैरे. पुण्याला 15 मिनिटे वीज गेली याची बातमी वर्तमानपत्रांनी द्यायची ठरवली तर पेपरात दुसरे काही छापायलाच नको. सगळी पाने याच बातम्यांनी भरून जातील.
काल माझी नात शाळेच्या वर्गातल्या एका मुलाच्या बर्थ डे पार्टीला गेली होती. इथे पण हे लोण आपल्याकडच्या सारखेच पोचलेले आहे. आपल्याकडे सुद्धा या बर्थ डे पार्ट्या ,गूडी बॅग्स आणि रिटर्न गिफ्ट्स यांनी पालकांच्या डोक्याला आणि खिशाला ताप आणला आहे. बरं! या पार्ट्या घरी वगैरे नसतात. मॅकडॉनल्ड्स, पिझ्झा हट, केएफसी वगैरे सारख्या ठिकाणी असतात. वाढदिवसाला जन्क फूडच फक्त खायचे असा नियमच झाला आहे. तर माझी नात या बर्थ डे पार्टीहून रिटर्न गिफ्ट म्हणून एक पतंग घेऊन आली. आल्यावर हट्टच धरून बसली की आताच पतंग उडवायला जायचं. घरातल्या इतर मंडळींनी काही फारसा उत्साह दाखवला नाही. माझी अशी प्रामाणिक समजूत होती की सिंगापूरमधे मोकळी जागा कुठली असणार पतंग उडवायला. त्यामुळे मी नातीला तोंड भरून आश्वासन देऊन टाकले की मी येतो पतंग उडवायला. पण जायचे कोठे? मोकळी जागा कोठे आहे? पण या प्रश्नाचे उत्तर तिच्याजवळ तयारच होते व ते मला लक्षातच नव्हते. आमच्या कॉन्डो जवळच दोन मोठी पटांगणे आहेत. तिथेच जायचे नातीचे फर्मान निघाले. आता आजोबाला काहीच पर्याय नसल्याने जावेच लागले. होता होता घरातली इतर काही मंडळीही तयार झाली.


पटांगणावर पोचल्यावर मात्र एकदम मजा आली. मोठी व मोकळी पटांगणे, पायाखाली हिरवेगार गवत व छान वार्‍याच्या येणार्‍या झुळुका यांनी एकंदरीतच सुखद वाटत होते. मग मलाही जरा हुरुप आला. नाहीतरी खूप वर्षात पतंग उडवलाच नव्हता. दोन चार अयशस्वी प्रयत्नांनंतर जमलेच. पतंग दोर्‍याला पूर्ण ताण देईपर्यंत वरवरच गेला. मग नातीलाही खूप मजा आली. अर्धा पाऊण तास मजा आली. मुख्य फायदा असा झाला की आतापर्यंत फक्त खेळणी दुरुस्त करून देऊ शकत असलेल्या आजोबाला, आता पतंग पण उडवू शकतो हे नवे क्रेडिट रेटिंग मिळाले. आजोबाचा भाव जरा वरच गेला.


या पतंग उडवण्याच्या प्रयत्नात एक नवीनच गंमतीदार गोष्ट कळली. सिंगापूरमधे नवीनच डॆव्हलप झालेला सेनकान्ग म्हणून एक भाग आहे. तो भाग अगदी जवळ जवळ बांधलेल्या उंच उंच इमारतींनी व्यापलेला असल्याने तो मला अजिबात आवडत नाही. या सेनकान्गमधे एक मोकळा प्लॉट होता. त्या प्लॉटवर खूप मुले पतंग उडवायला वीकएन्डला जात असतात. इथल्या हाऊसिंग डेव्हलपमेंट बोर्डाने तेथे एक आणखी उंच इमारत बांधण्याचे ठरवले. लोकांना जेंव्हा हे समजले तेंव्हा आता आपण पतंग कोठे उडवायचे हे त्यांना कळेना. बरीच चर्चा झाल्यावर तिथल्या रहिवाशांनी हाऊसिंग बोर्डाला त्या प्लॉटवर इमारत न बांधता तो पतंग उडवण्यासाठी मोकळा सोडण्याची विनंती केली. सर्वच स्थानिक लोकांचा ही जागा मोकळी सोडायला पाठिंबा आहे हे कळल्यावर हाऊसिंग बोर्डाने म्हणे चक्क माघार घेतली व तो प्लॉट पतंग उडवण्यासाठी मोकळा ठेवण्यात आला.
प्लॉट मोकळा सोडला या गोष्टीचे तितकेसे महत्व मला वाटले नाही. कारण असे जगातल्या कोणत्याही लोकशाही असलेल्या देशात होऊ शकते. पण पतंग उडवण्यासारख्या गोष्टींसाठी जागा मोकळी सोडणे ही गोष्ट मला फारच महत्वपूर्ण वाटली. सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी सिंगापूरचे सरकार काहीही करायला तयार असते याचे हे एक छोटेसे उदाहरण मला वाटले. कोपर्‍या कोपर्‍यावर, पार्क्स, उद्याने बांधणे किंवा छोटे तलाव, जलाशय निर्माण करणे या सारख्या सुविधा निर्माण केल्या की सर्वसामान्य नागरिकाचे जीवन सुसह्य होण्यास काहीतरी का होईना हातभार लागू शकतो, हे सूत्र इथल्या सरकारने चांगलेच ध्यानात ठेवलेले आहे.
या सेनकान्ग भागाजवळ एक पुंगोल पार्क म्हणून आहे. या पार्कमधे मध्यभागी एक लंबगोलाकार जलाशय आहे. या जलाशयाभोवती फिरत असताना मला एक दिवस लक्षात आले होते की छोट्या छोट्या रेडियोने नियंत्रित केलेल्या बोटी तयार करून त्या पाण्यात चालवण्याच्या छंदप्रिय लोकांसाठी एक खास सुविधा तेथे निर्माण केलेली आहे. जरा मोठ्या वयाची मुले या सुविधेचा छान फायदा घेताना दिसली. नागरिकांची क्वालिटी ऑफ लाईफ वाढवण्याचा आणखी एक छोटासा प्रयत्न असेच मला तो जलाशय बघून त्या वेळी वाटले होते.
सिंगापूरमधे अशाच काहीतरी बारीक सारीक गोष्टी नजरेसमोर येतात व आपण अजून कोणत्या जगात वावरतो आहोत हे लक्षात येऊन मन थोड्या वेळासाठी खिन्न होते हे मात्र खरे! असो. सिंगापूरबद्दल कमी जास्ती असेच परत कधीतरी!
29 ऑगस्ट 2010

No comments:

Post a Comment