A two lane metaled road goes towards north, from a side of the world famous Angkor Wat temple in Cambodia. This road actually leads to the beautiful Bante Strai temple. Somewhere on the way, a traveller may see few tiny single storied buildings. These buildings house a small museum, which depicts heartrending history of Cambodia, over last sixty or seventy years. This small museum actually brings out a message that is so powerful and important that each and every visitor to Cambodia comes here and pays his respect for few seconds to the hapless, unfortunate victims of war.
Even a cursory look at Cambodian history of last sixty or seventy years tells us a story of continuous and bloody civil war. In second world war, this country was won by Japanese from French. In 1945 after defeat of Japan, it was reoccupied by France. Around same time. underground communist forces started a war of Independence along with Vietnam. After their defeat at Din Bin Foo, French gave up Vietnam and Cambodia also became independent. In 1965 Cambodia broke off diplomatic relations with US and allowed North Vietnamese forces, fighting the US, to open secret bases within Cambodia. Aggrieved US started bombing Cambodia on regular basis from 1969. कंबोडिया मधल्या जगप्रसिद्ध अंगकोर वाट मंदिराच्या बाजूने एक लहानसा रस्ता उत्तरेला जातो. या रस्त्यावरच पुढे 25/30 किलोमीटर अंतरावर बांते स्राय मंदिर आहे. या मंदिराकडे जाताना मधे कुठेतरी या रस्त्याच्या उजव्या हाताला असलेल्या काही छोटेखानी बैठ्या इमारती आपल्याला दिसतात. या इमारतींतच एक आगळेवेगळे व गेल्या साठ सत्तर वर्षांत घडलेला एक अतिशय हृदयद्रावक असा, इतिहास सांगणारे एक छोटेसे संग्रहालय उभे आहे. संग्रहालय छोटेसे असले तरी ते जो संदेश देते आहे तो इतका महत्वाचा आहे की कंबोडियाला भेट देणारा प्रत्येक पर्यटक या संग्रहालयाला भेट देऊन इथे दोन क्षण स्तब्ध उभा राहिल्याशिवाय पुढे जाऊच शकत नाही.
मागच्या साठ सत्तर वर्षातल्या कंबोडियाच्या इतिहासाकडे नजर जरी टाकली तरी सतत चालणार्या यादवी युद्धांशिवाय आपल्याला काहीच दिसणार नाही. फ्रेंच अधिपत्याखाली असलेला हा देश दुसर्या महायुद्धात जपानी सैन्याने कंबोडिया जिंकून ताब्यात घेतला. 1945मधे जपानी सैन्याचा पराभव झाल्यावर पुन्हा एकदा फ्रेंच राज्यकर्ते येथे आले. याच सुमारास कम्युनिस्ट भूमिगत सैनिकांनी येथे फ्रेंच सैनिकांशी लढा देण्यास सुरवात केली. व्हिएटनाममधल्या दिन बिन फू येथील निर्णायक लढाईत पराभव झाल्यावर फ्रेंच सैनिकांना व्हिएटनाम सोडणे भाग पडले व याच सुमारास कंबोडिया हा देश ही स्वतंत्र झाला. 1965 मधे कंबोडिया सरकारने अमेरिकेशी राजनैतिक संबंध तोडून टाकले व अमेरिकन सैनिकांशी लढणार्या उत्तर व्हिएटनाम फौजांना कंबोडियामधे गुप्त तळ उभारण्यास परवानगी दिली. या मुळे 1969 पासून अमेरिकन बॉम्बफेकी विमानांनी कंबोडिया मधे नियमितपणे बॉम्बवर्षाव करण्यास सुरवात केली. 1970 मधे सिंहनुक याच्या कम्युनिस्टधार्जिण्या सरकारला पदच्युत करून जनरल लॉन नॉल याने सत्ता ताब्यात घेतली. सिंहनुक पळून चीनमधे गेला व तेथे त्याने ख्मेर रूज ही भूमिगत सेना स्थापन करून त्याने जनरल लॉन नॉल याच्या सैन्याशी लढण्यास सुरवात केली. यावेळेस जनरल लॉन नॉल याच्या सेना, व्हिएटनाम च्या कंबोडियामधे असलेल्या फौजा व सिंहनुकचे कमुनिस्ट भूमिगत सैनिक यांच्याशी लढा देऊ लागल्या. अमेरिकन बॉम्बवर्षाव हा चालूच राहिला.
1975 मधे पॉल पॉट याच्या नेतृत्वाखालच्या कम्युनिस्ट फौजांनी जनरल लॉन नॉल यांच्या फौजांचा पराभव केला व पुढची 3 वर्षे न भूतो न भविष्यती असा नरसंहार कंबोडियात घडवून आणला. 1978 मधे अमेरिकन सैन्याविरूद्धची लढाई जिंकलेले व्हिएटनामी सैन्य, परत एकदा कंबोडियामधे घुसले व त्यांनी 1979 पर्यंत पॉल पॉट राजवट उलथून टाकली. पॉल पॉटचे सैन्य परत एकदा भूमिगत झाले व लढाई चालूच राहिली. 1989 मधे व्हिएटनामी सेना कंबोडियामधून परत गेल्या व 1991 मधे शांती समझोता झाला व अखेरीस कंबोडिया मधली यादवी संपली.
या यादवीच्या कालात बॉम्ब्स, सैनिकी रॉकेट्स, मॉर्टर्स, याचा अक्षरश: सडा कंबोडियाच्या भूमीवर पडला. तसेच या यादवीमधे लढणार्या निरनिराळ्या फौजांनी कंबोडिया मधे मोठ्या विस्तृत प्रमाणात भू-सुरूंगांची पेरणी करून ठेवली. शांती प्रस्थापित झाल्यावर यापैकी न उडलेले बॉम्ब्स, रॉकेट्स व सर्वात धोकादायक असलेले भू-सुरूंग यांचे एक प्रचंड धोकादायक संकट कंबोडियाच्या ग्रामीण भागातील नागरिकांच्या समोर उभे राहिले. कंबोडिया मधे आज प्रत्येक 290 नागरिकांमागे एक या प्रमाणात म्हणजे 40000 पेक्षा जास्त संख्येने, भू-सुरूंगांच्यामुळे अपंग झालेल्या व्यक्ती आहेत. मागच्या वर्षी अशा अपंग होणार्यांची संख्या खूपच घटली असली (अंदाजे 250 व्यक्ती) तरी हे संकट अजुन संपलेले नाही एवढेच यावरून दिसते. या भू-सुरूंगांचा स्फोट होऊन जखमी होणार्यात, मुख्यत्वे लहान मुले असल्याने कंबोडिअयन नागरिकांची एक पिढीच पंगू झाल्यासारखी आहे. भू-सुरूंगांच्या या संकटावर कायमचा उपाय म्हणजे ते शोधून काढून नष्ट करणे. परंतु हे काम अतिशय कठिण व धोकादायक असते.
आकि रा
आकि रा (Aki Ra) ही एक अशीच सर्वसामान्य कंबोडिअयन व्यक्ती. वयाच्या दहाव्या वर्षी त्याला ख्मेर रूज राजवटीत एक बाल-सैनिक बनवण्यात आले. तो म्हणतो की “ख्मेर रूज सैनिकांनी माझ्या आई-वडीलांना ठार मारले असल्यामुळे मी या सैन्याच्या कॅम्प्स मधेच वाढलो. आम्हाला सैन्यात दाखल करून घेतल्यावर प्रथम एक बंदुकीच्या गोळ्यांनी भरलेली AK-47 रायफलच हातात देण्यात आली. ते अत्यंत धोकादायक हत्यार सतत बाळगतच आम्ही सर्व शिक्षण घेतले. आम्हाला या बंदुका खेळातल्याच वाटत असल्याने व या बंदुकीने होणार्या हानीची कल्पनाच नसल्याने, माझ्यासारखे अनेक बाल-सैनिक स्वत:च्या किंवा मित्राच्या बंदुकीचे शिकार झालेले मी बघितले आहेत. ही बंदूक माझ्याच उंचीची असल्याने ती हाताळणे मला कठिण गेले. फळे, नदीमधले मासे यांच्यावर नेम धरून गोळ्या झाडत ही बंदूक चालवायला मी शिकलो. याच पद्धतीने रॉकेट लॉन्चर, मॉर्टर्स ही हत्यारे मला सहज उपलब्ध होती. ही हत्यारे चालवायला बंदुकीच्या मानाने सोपी होती. मी प्रथम ख्मेर रूजच्या बाजूने लढलो व नंतर व्हिएटनामी सैनिकांच्या बरोबर लढलो.”आकि रा व इतर बाल-सैनिक
1965 ते 1973 या कालात अमेरिकन बॉम्बफेकी विमानांनी 60000 च्या वर बॉम्बफेकी फेर्या केल्या. यावेळी टाकलेल्या बॉम्ब्स पैकी हजारो बॉम्ब न फुटता तसेच पडून राहिले आहेत. अमेरिकन बॉम्ब्समुळे अंदाजे 6 लाख कंबोडियन नागरिक मृत्युमुखी पडले असावेत.1997 मधे आकि रा याने कंबोडियाच्या विविध भागात पडून राहिलेले भू-सुरूंग व बॉम्ब्स आपण निकामी करण्यास सुरवात करावी असे ठरवले. त्याला प्रथम कोणतीच मदत मिळाली नाही. स्वत: तो आणि काही सहकारी यांच्या मदतीने त्याने अतिशय धोका पत्करून व स्वत;च्या हिंमतीवर हे काम सुरू केले. गेल्या दहा वर्षात अक्षरश: हजारोंनी असे भू-सुरूंग व बॉम्ब्स अकि रा च्या टीमने निकामी केले आहेत. 2001 मधे एक कॅनेडियन सेवा संस्था अकि रा याच्या मदतीला आली. या सहकार्यातून CLMMRF NGO ही संस्था निर्माण झाली. ही संस्था हे भू-सुरुंग व बॉम्ब्स यांच्या स्फोटात अजाणतेपणे बळी पडून अपंगत्व आलेल्या मुलांचे संगोपन व त्यांना कामधंदा मिळवून देणे हे अतिशय मोलाचे कार्य करत आहे.या संग्रहालयाच्या आजूबाजूसच ही मुले राहतात.
निकामी केलेले मॉर्टर्स
निकामी बॉम्ब्स
भू-सुरूंग
भू-सुरुंगांचे अणखी एक दृष्य
वाहने नष्ट करणारे भू-सुरूंग
आकि रा याच्या टीमने निकामी केलेले हजारोच्या संख्येचे भू-सुरूंग व बॉम्ब्स या संग्रहालयात ठेवलेले आहेत. संग्रहालयात प्रवेश करतानाच दोन्ही बाजूंना मोठे क्लस्टर बॉम्ब्स मांडून ठेवलेले आपल्याला दिसतात.रशियन बनावटीचा क्लस्टर बॉम्ब
ख्मेर रूज सैनिकी आऊटपोस्टचा मॉक अप
भू-सुरूंग स्फोटातील बळींचे स्मारक, मागे अकि रा व त्याचे सहकारी यांची छायाचित्रे
कंबोडियावरचे अमेरिकन बॉम्बिंग व यादवी युद्धात पेरलेले भू-सुरूंग यांना बळी पडून अपंगत्व आलेली मुले यांचा संभाळ व या पुढे तरी हा धोका राहू नये म्हणून सुरूंग निकामी करण्याचा प्रयत्न या दोन्ही गोष्टी करणारा अकि रा हा एक महा मानवच आहे असेच हे संग्रहालय पहाताना सारखे मनात येत राहते.11 डिसेंबर 2010
No comments:
Post a Comment