Murder of Ram-Nadi River
A small river called 'Ram-Nadi' by the locals, with headwaters near a small village of Khatapewadi, southwest of Pune city and near the town of Bhukum, flows for a small distance of 48 KM before merging with Mula river flowing towards Pune city from north, at a point on the northern boundary of Baner village.
Even though it is a small river, no detailed hydrological studies or data is required to prove that Ram-Nadi river carries plenty of water during rainy season. A small percolation tank and two major water reservoirs have been created on this river by constructing dams in the river bed.
पाषाणचा तलाव
पुणे शहराच्या उत्तरेकडून वहात येणार्या मुळा नदीला, राम नदी ही एक छोटेखानी नदी, बाणेर गावाच्या उत्तर सीमेजवळ जाऊन मिळते. ही राम नदी साधारण 48 किमी लांबीची नदी असून पुण्याच्या नैऋत्येला असलेल्या भुकुम या गावापासून थोड्या अंतरावर असलेल्या खटपेवाडी खेड्याजवळ उगम पावते. ही नदी छोटेखानी असली तरी पावसाळ्यात या नदीला बरेच पाणी असते. ही गोष्ट सिद्ध करण्यासाठी कोणत्याही आकड्यांचा अभ्यास करण्याची गरज वाटत नाही कारण या छोटेखानी नदीवर एक छोटा पाझर तलाव व दोन मोठे जलाशय बंधारे टाकून बनवलेले आहेत.यापैकी पाषाणचा जलाशय ब्रिटिशांनी एकोणिसाव्या शतकात गव्हर्नर हाऊस व खडकी गॅरिसनला पाणी पुरवठा करण्यासाठी पाषाण गावात राम नदीवर बंधारा बांधून निर्माण केला होता तर दुसरा जलाशय साधारण 20 ते 25 वर्षांपूर्वी पुण्याच्या पश्चिमेला असलेल्या भुगांव जवळ बंधारा बांधून बनवण्यात आलेला आहे. या जागी आता एक मोठे जलक्रीडा केंद्र उभारण्यात आलेले आहे.
भुगांव जलाशयावरचे जलक्रीडा केंद्र
या वर्णनावरून वाचकांच्या लक्षात आलेच असेल की ही राम नदी पुण्याच्या पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वाचीच आहे.
ही राम नदी पाषाण तलावातून पुढे काही अंतर बाणेर हिल् व पाषाण हिल या नावाने ओळखल्या जाणार्या डोंगरांच्या पायथ्यापासून वहात उत्तरेला जाते. हा भाग 'बाणेर पाषाण बायो डायव्हर्सिटी पार्क' म्हणून सध्या तरी आरक्षित आहे. पुणे विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावरून राजभवनाच्या मागील बाजुने जाणारा बाणेर रस्ता या पार्कच्या उत्तरेला ही नदी ओलांडतो. हा रस्ता ते आणखी उत्तरेला असलेली मुळा नदी, या भागातील सर्व भूखंड बाणेर गावाच्या हद्दीत येतात.
मागील भागात आपण बघितल्याप्रमाणे, देहूरोड-कात्रज बाह्य वळण रस्ता या भागातून काढला गेल्यावर या भागाला अतिशय महत्व प्राप्त झाले. पश्चिमेला असलेल्या हिंजेवाडी जवळ अतिशय मोठ्या प्रमाणात माहिती उद्योग आला आहे. या सर्व गोष्टींमुळे बाणेर भागातील भूखंडाना सोन्याचे मोल आले आहे. या भागात असलेल्या जमिनी विकसित करण्यात सगळ्यात मोठा अडसर येतो आहे राम नदीचा. राम नदीचे पात्र या भागातून वेडी वाकडी वळणे घेऊन वहात असल्याने, बांधकाम व्यावसायिकांच्या दृष्टीने कितीतरी जमीन वाया गेल्यासारखी आहे. या प्रश्नाचे उत्तर तसे म्हटले तर सोप्या पद्धतीने देता येते. राम नदीचे अस्तित्वच संपवून टाकले की प्रश्नच संपला.
बांधकाम व्यवसायिकांच्या मदतीला येथे पुणे महानगरपालिका धावून आल्यासारखे दिसते आहे. पुणे शहरातले नाल्यांचे अस्तित्व किती सहजपणे पुणे महानगरपालिकेने संपवून टाकले होते ते आपण मागील भागात बघितलेच आहे. तेच तंत्र येथे वापरून महानगरपालिका राम नदीचे अस्तित्व संपवण्याच्या मागे आहे असे दिसते. पुणे शहरातील पावसाच्या पाण्याचा निचरा कसा करायचा या साठी महानगरपालिकेने बनवलेले काही प्लॅन्स आपण मागील भागात बघितले होते. या प्लॅन्सपैकी, पाषाण-बाणेर भागासाठी बनवलेला आराखडा आता आपण बघूया. या भागातील प्लॅन बघताना राम-नदी ला विसरताच येणार नाही. महानगरपालिकेचा आराखडा या नदीचे पात्र व्यवस्थित रित्या दाखवतो खरा! पण या नदी पात्राला, या आराखड्यात नाला एफ एन 1 (FN1) असे नाव देऊन टाकलेले आहे. मात्र नजरचुकीने, पाषाण बंधार्याचे नाव मात्र (Dam to River) नदीवरील धरण असेच राहिलेले आहे.
राम नदीला एकदा कागदोपत्री नाला बनवले की पुणे शहरातील इतर नाल्यांसारखे या नदीचे अस्तित्व संपवणे सोपे जाईल असे महानगरपालिकेला वाटत असले तरी प्रत्यक्षात या नदीला नेहमीच थोडेफार का होईना पाणी असते. त्यामुळे इतर नाल्यांसारखी डबर व माती टाकून राम नदी बुजवून टाकणे शक्य नाही हे लक्षात आल्याने नदी सुधारणा योजना या नावाची एक योजना, 'जवाहरलाल नेहरू शहरी पुनर्निर्माण योजना' या योजनेच्या अंतर्गत मिळालेल्या पैशांमधून, पुणे महानगरपालिकेने सुरू केली. या योजनेमध्ये नाल्यांची पात्रे, कॉंक्रीट चॅनेल्स व बंद नळ यातून नेण्याचे ठरवले. वास्तविक रित्या कोणताही जलप्रवाह जेंव्हा जमीनीवरून वहात असतो तेंव्हाच त्या प्रवाहानिकट, एक पर्यावरण प्रणाली निर्माण होत असते. कॉंक्रीट चॅनेल्स मधून नेलेल्या नाल्यांना अशी प्रणाली निर्माण होत नाही व डासांची प्रमाणाबाहेर उत्पत्ती, या सारखे असंख्य प्रश्न निर्माण होतात. पर्यावरण तज्ञांनी हा मुद्दा महानगरपालिकेसमोर मांडला परंतु महानगरपालिकेने त्याकडे लक्ष न देता ही योजना राबविण्याचेच ठरवले.
राम नदीच्या पात्रात मंजूर झालेले प्लॉट्स ले आउट्स(हिरव्या रंगात)
राम नदीच्या पात्राचे चॅनेलायझेशन
राम नदीचे पात्र, अशा कॉंक्रीट चॅनेल्स व नळ यातून न्यायचे ठरल्याबरोबर या नदी पात्राजवळ असलेल्या जमीनींमध्ये बांधकामांचे प्लॅन व ले आऊट महानगरपालिकेने मान्य करण्यास सुरूवात केली. यात कोणाचा, कोणाचा फायदा झाला असेल हे उघड आहे. असे आराखडे मंजूर झाल्यावर बांधकामे सुरू झाली. आपल्या हद्दीत राम नदीचे पाणी येऊ नये म्हणून बांधकाम व्यावसायिकांनी संरक्षक भिंती बांधल्या. देहूरोड-कात्रज बाह्य वळण रस्ता जिथे या नदीला ओलांडतो, तेथे मूळ नदीपात्राच्या फक्त 1/3 रूंदीचे नळ रस्त्याखाली टाकले गेले आहेत.
राम नदी का गटार?
मानवी प्लॅन्स व आराखड्यांचे निसर्गाला काही सोयर सुतक नसते हे राम नदीने चांगलाच दणका देऊन दाखवून दिले. 2 जुलै 2007 मध्ये नदीला आलेल्या पुराने, नदीच्या पात्रात चालू असलेली सर्व बांधकामे पुरात गेली. त्यानंतर दर वर्षी पूर येतच राहिला आहे. ऑक्टोबर 2010 मध्ये आलेल्या पुरात बाणेरचा बराचसा भाग पाण्याखाली गेला. नदीच्या पात्रात निर्माण केलेल्या क़ोंक्रीट चॅनेल्समुळे ही पूर परिस्थिती अधिकच बिकट होत चालली आहे.
महानगरपालिका काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही हे समजल्यावर पुण्यातील जल बिरादरी या संघटनेने अखेरीस मुंबई हाय कोर्टाचा दरवाजा खटखटवण्याचे अखेरीस ठरवले व मार्क 2011 मध्ये हाय कोर्टात रिट अर्ज दाखल केला. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यावर जल बिरादरीच्या तक्रारीत तथ्य असल्याचे कोर्टाच्या लक्षात आले व महानगरपालिकेला नद्यांच्या पात्रात कोणतीही कामे करण्यास पुढच्या सुनावणीपर्यंत मनाई करण्यात आली.
पुढची कामे जरी सध्या थांबलेली असली तरी या भागात झालेल्या सदनिका व इतर इमारती यांच्या संरक्षक भिंतींमुळे राम नदीचे पात्र काही ठिकाणी अतिशय चिंचोळे झाले आहे. पावसाळ्यात एकदा का भुगांव व पाषाण जलाशय भरले की नदीचे पाणी खाली वहात येऊन मुळा नदीकडे जाणार हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. त्यामुळे या पुढे प्रत्येक वर्षी बाणेर रहिवाशांना पुराचा व त्यामुळे होणार्या जिवित व वित्त हानीचा धोका हा संभवतोच. अत्यंत आरामदायी व सुखसोईंनी युक्त सदनिका व बंगल्यांच्या जाहिराती वाचून या भागात सदनिका खरेदी केलेल्या रहिवाशांना, दर वर्षी पावसाळ्यात, जीव मुठीत घेऊनच रहावे लागणार आहे यात शंका नाही.
25 जानेवारी 2012
No comments:
Post a Comment