I have decided to visit two picturesque spots in the Deccan plateau today. This is a must, as I am feeling completely 'templed out' after visiting so many ancient temples over last week. I have been spending most of my time over last few days in the kingdom of Chalukya kings and want to return to present.During my travels of last few days, I have crossed the river Malprabha number of times. This river finally confluences with one of the mightest rivers of the south India; river Krishna, near a place named as 'Kudal'. I am on my way to visit this place now.
कृष्णा, मलप्रभा नद्यांचा कुडाळ येथील संगम
गेले काही दिवस चालुक्य राजांच्या कालात रमलेले माझे मन परत वर्तमानात यावे म्हणून दख्खनमधली दोन अतिशय रम्य ठिकाणे आज बघायची ठरली आहेत. गेले काही दिवस मंदिरांचा नाही म्हटले तरी ओव्हरडोस झाला आहे हे नक्की. इंग्रजीमध्ये याला ‘Templed out’ अशी एक फ्रेज रूढ होते आहे . मराठीत त्याला समांतर शब्द मला तरी सुचत नाहीये. गेले काही दिवस ज्या मलप्रभा नदीच्या परिसरात मी फिरतो आहे. ही नदी कृष्णा नदीला कुडाळ या ठिकाणी जाऊन मिळते. या संगमस्थानाकडे मी आता चाललो आहे.
पात्रामधे बांधलेल्या शिवलिंगाच्या भोवतीच्या विहिरीत जाण्यासाठी बांधलेला पूल
शिवलिंगाच्या भोवतीच्या विहिरीत खाली जाण्यासाठी बांधलेला जिना व शिवलिंगावरची कॅनपी
विहिरीत उतरण्यासाठी बांधलेला वर्तुळाकार जिना
मलप्रभा नदीचे पात्र
कृष्णा नदीचे पात्र या ठिकाणी खूपच रूंद आहे. त्या मानाने मलप्रभा नदी अगदीच लहानशी दिसते आहे. मात्र हे संगम स्थान अतिशय रम्य आहे यात शंकाच नाही. निळेशार पाणी, कडेला असलेले हिरवेगार काठ व वर तसेच निळेशार आकाश, सर्व आसमंत या निळाईत बुडूनच गेल्यासारखा वाटतो आहे. संगमस्थानावर पात्रामध्ये आधी एक शिवलिंग होते. कृष्णा नदीवर बांधलेल्या धरणामुळे या ठिकाणी नदीच्या पात्राची ऊंची खूप वाढली व शिवलिंग पाण्यात गेले. या भागात लिंगायत लोकांची प्रामुख्याने वस्ती आहे. त्यांना हे चालले नाही. त्यामुळे आता शासनाने त्या शिवलिंगाभोवती एक वर्तुळाकार विहिरच बांधून घेतली आहे. या विहीरीच्या तळाशी हे शिवलिंग आहे व काठापासून या विहीरीत उतरण्यासाठी एक पूल व वर्तुळाकार जिना बनवला आहे. या विहीरीच्या तोंडावर नदीच्या भर पात्रात उभे राहिले की इतके प्रसन्न वाटते आहे की शब्दात वर्णन करणे मला तरी शक्य नाही.विशाल अलमाट्टी धरण
अलमाट्टी धरणावर जाण्यासाठीचे प्रवेशद्वार
कुडाळ संगम बघून मी आता उत्तरेच्या दिशेने निघालो आहे. वाटेत एक अतिविशाल धरण लागते आहे. हेच ते अलमाट्टी धरण, ज्याच्या ऊंचीवरून महाराष्ट्र व कर्नाटक यांच्यात वाद चालू आहे. या धरणाचे बॅक वॉटर पार सांगली पर्यंत पोचते आहे. आता याची ऊंची अधिक वाढली तर पाणी किती गावांच्यात घुसेल यावरूनच वाद चालू आहे. अलमाट्टी धरणाने बागलकोट व विजापूर जिल्ह्यांचा मात्र कायापालट केला आहे. सगळीकडे सुजलाम सुफलाम धरती दिसते आहे. विजापूर जिल्हा खरे म्हणजे दुष्काळीच. परंतु आता याच दुष्काळी भागाचा कायापालट होतो आहे. या आधी आम्ही इरकल गावामधे थोडा वेळ थांबलो होतो. इरकली साड्यांसाठी हे गाव प्रसिद्धच आहे. मी तिथून इथल्या वैशिष्ट्यपूर्ण ब्याडगी मिरच्यांची पूड खरेदी केली. ही मिरची तितकीशी तिखट नाही पण पदार्थाला मस्त लालभडक रंग आणते. रस्त्याच्या कडांना वाळलेल्या लाल मिरच्यांचे ढीग सतत बघितल्यामुळे बहुदा ही खरेदी मी केली असावी.कृष्णा गार्डनचे प्रवेशद्वार
कृष्णा गार्डन अलमाट्टी
अलमाट्टी धरणाच्या कडेला एक सुंदर बाग शासनाने विकसित केली आहे. अतिशय छान परिसर, पशू, पक्षांचे सुंदर पुतळे यांनी बाग सजवली आहे. खूप शाळकरी मुले मजा करायला येताना दिसत आहेत. मला मात्र येथे थांबणे शक्य नाही कारण मला गाठायचे आहे विजापूर.हसन गन्गू बहमनी याने दख्खनच्या पठारावर 1347 मधे स्थापन केलेले बहमनी साम्राज्य, 1480 च्या सुमारास लयाला गेले व या राज्याचे पाच तुकडे झाले. बेरारची इमादशाही, बिदरची बरीदशाही, गोळकोंड्याची कुतुबशाही, अहमदनगरची निझामशाही व विजापूरची अदिलशाही अशा पाच नवीन राजवटी निर्माण झाल्या. या शिवाय विजयनगरचे साम्राज्य आपली ताकद राखून होतेच. 1565 मधे या सर्व शाह्या एकत्र झाल्या व त्यांनी बनीहट्टी या ठिकाणी विजयनगरच्या फौजांचा पराभव केला. यानंतर विजयनगरचे साम्राज्य नष्ट झाले परंतु नंतरच्या कालात या सर्व सुलतानांची, आपापसात व दिल्लीचे मुघल यांच्याबरोबर, सतत युद्धे होत राहिली व एक एक एक करून ही राज्ये नष्ट होत गेली. 1636 मधे निझामशाही नष्ट झाली व उत्तरेला मुघल व दख्खनमधे विजापूरची अदिलशाही एवढी दोनच शक्तीमान राज्ये उरली.
1489 ते 1686 एवढ्या प्रदीर्घ कालखंडात अदिल शाही राजघराण्याने विजापूर या राजधानीतून, मराठ्यांचे स्वराज्य सोडले तर कमी जास्त प्रमाणात दख्खनवर, निरंकुश सत्ता गाजवली. 1686 मधे मुघल सम्राट औरंगजेब याने विजापूर जिंकून घेतले व अदिलशाहीचा अंत झाला. या मधल्या कालखंडात, विजापूर ही एका मोठ्या राज्याची राजधानी असल्याने, साहजिकच या कालखंडाच्या खाणाखुणा विजापूरच्या अंगाखांद्यावर दिसतात. माझ्या दख्खनच्या पठारावरच्या या भटकंतीत म्हणूनच विजापूर हा थांबा अगदी आवश्यकच आहे.
विजापूर शहरात कोणत्याही दिशेने आत शिरले तरी प्रथम उठून दिसते ते ‘गोल घुमट‘ हे अप्रतिम स्थापत्य. त्यामुळेच माझा विजापूरचा फेरफटका या गोल घुमटापासूनच मी सुरू करतो आहे. सकाळी लवकर उठून सूर्योदयाच्या वेळी मी गोल घुमटासमोर उभा आहे. आवारात शिरताना समोर एक दर्शनी (Facade) इमारत समोर दिसते आहे तिचे नाव आहे नक्करखाना. या इमारतीत आता संग्रहालय आहे. या गोल घुमटाच्या आवारातच पूर्वीची जैन मंदिरे होती असा शोध नुकताच लागला आहे कारण त्या मंदिरांचे काही खांब आता उत्खननात सापडले आहेत. मी उभा आहे त्या ठिकाणापासून या नक्करखाना इमारतीच्या मागे, गोल घुमटाचे मुख्य स्थापत्य लपूनच गेले आहे. फक्त घुमट व मिनार यांचा वरचा भाग दिसतो आहे. मुख्य इमारतीची भव्यता दर्शकाच्या मनावर ठसवण्यासाठी या प्रकारच्या इमारती पूर्वी बांधल्या जात असत. हा नक्करखाना व मुख्य गोल घुमटाचे स्थापत्य यांच्या मधे आणखी एक प्रवेश इमारत आहे. या इमारतीच्या प्रवेशद्वारापाशी उभा राहून मी पुढे चालत जातो आहे. या प्रवेश वास्तूच्या द्वारामधून गोल घुमटाची मुख्य इमारत दिसते आहे खरी पण या वास्तूचा प्रवेश दरवाजा असा काही बनवलेला आहे की पुढे चालत जात असताना समोरचा गोल घुमट आकाशात चंद्र उगवावा तसा त्या खालच्या स्थापत्याच्या डोक्यावरून वर वर येताना दिसतो आहे.
सूर्योदयाच्या वेळी दिसणारा गोल घुमट, समोर नक्करखाना ही इमारत
गोल गुमटाच्या परिसरातील उत्खननात मिळालेले जैन मंदिराचे स्तंभ
सकाळच्या उन्हात इब्राहिम आदिल शहा त्याची बेगम व कुटुंबीय यांच्या चमकणार्या कबरी
छताला आधार देणारी ब्रॅकेट्स, बाजूला पूर्वेकडचा मिनार
छताच्या कठड्याचे खांब
घुमटाजवळची व्हिस्परिंग गॅलरी
गोल घुमट इमारतीच्या पायापाशी पोचले की त्या इमारतीच्या भव्यतेची खरी कल्पना येते. बाजूच्या एका छोट्या दरवाजाने मी आत शिरतो. समोर मोहम्मद अदिल शहा, त्याची बेगम वगैरे मंडळींच्या कबरी आहेत. परंतु माझे लक्ष मात्र बाजूंच्या छोट्या झरोक्यांच्यावर खिळले आहे. त्या झरोक्यांच्यातून सकाळच्या उगवत्या सूर्याचे किरण त्या कबरींच्या वर पडत आहेत व त्या सर्व कबरी खूप फ्लडलाईट लावावे तशा प्रकाशमान झाल्या आहेत. हे अदिल शाही राजे गादीवर आल्यावर प्रथम काय करत असत तर स्वत:चे थडगे बांधायला सुरूवात करत असत कारण त्या वेळच्या अनिश्चिततेच्या कालात तो राजा किती जगेल? हे सांगणे कठिणच होते व अशा वेळी थडगे तयार नसले तर त्या राजाचे महत्व कसे पुढे उरणार? असा एक सोपा विचार त्या मागे असावा असे मला वाटते. या गोल घुमटाच्या स्थापत्याच्या चारी बाजूंना चार मिनार आहेत. या मिनारांना असलेल्या जिन्याने सात मजले चढून मी आता घुमटाच्या आतील बाजूपाशी पोचलो आहे. या ठिकाणी, घुमटाच्या आतील बाजूस, ध्वनीच्या अनेक परावर्तनांमुळे निर्माण होणारे अनेक आश्चर्यजनक ध्वनी परिणाम ऐकता येत आहेत. घुमटाच्या समोरच्या बाजूस केलेला कागद चुरगळल्याचा आवाज किंवा कुजबुज ही 38 मीटर अंतरावर मी उभा आहे येथे इतकी स्पष्ट ऐकू येते आहे की या गॅलरीला कुजबुज गॅलरी का म्हणतात ते लगेच स्पष्टच होते आहे. हे स्थापत्य ज्या कोणी बांधले आहे त्यांच्या कारागिरीला दाद द्यावीशी मला वाटते आहे. गोल घुमटाचा हॉल 205 फूट लांबी, रूंदीचा आहे. हा हॉलचे छत 100 फूट ऊंचीवर आहे व 38 मीटर(120 फूट) व्यासाचा घुमट या छताच्या वर बांधलेला आहे. ही इमारत बांधण्यासाठी 30 वर्षे लागली होती.
No comments:
Post a Comment