I had two very contrasting experiences last week. It is not that these experiences were some kind of crisis or calamities in my life. These two incidences were just ordinary happenings, all of us face in our every day life.
Last Sunday morning, I found out that the Modem connected to my telephone line was not working properly. This contraption has three or four LED lights, two of which are illuminated all the time. One of these LED's was not lighted up. I tried usual measures like switching off everything and then switching it on again etc. Still the Modem refused to cooperate with me. I thought for some time and then finally found out the help line number of the telephone service provider and registered my complaint. Surprisingly, the operator at the other end, talked sympathetically with me and promised all help. She promised that a mechanic would visit my place on the same day in spite of it being a Sunday.
Since the modem was not working, my internet connection was gone. I took out all kinds of pending works and kept myself busy. There were two calls from the telephone service provider on that day and in the evening, the mechanic also turned up. He checked up my connection and told me that the telephone line was working faultlessly but the Modem has gone defective. Since the modem has been rented by me, telephone company would replace it free of cost, but I need to go to the telephone exchange personally and get my defective modem exchanged. Reluctantly I had to visit the telephone exchange next day with the modem.मागच्या आठवड्यात आलेले दोन अनुभव मला बरेच काही सांगून गेले. हे अनुभव म्हणजे माझ्यावर गुदरलेले फार मोठे प्रसंग किंवा घटना वगैरे काही नव्हत्या. हे दोन अनुभव आहेत, अगदी तुमच्या आमच्या आयुष्यात नेहमी घडणारे, आपल्याला नेहमी अनुभवायला लागणारे असेच!
मागच्या रविवारी सकाळी उठल्यावर लक्षात आले की माझ्या टेलिफोन लाईनला जोडलेले मॉडेम नावाचे यंत्र चालू नाहीये. हे मॉडेम माझ्या टेलिफोन लाईनला नेहमी जोडलेले असते व त्यामुळे त्याच्यावरचे एलईडी दिवेही सतत लागलेले असतात. रविवारी सकाळी त्यातला एक दिवा लागत नाहीये हे लक्षात आल्यावर नेहमीचे सर्व खटाटोप करून बघितले. बंद करून पुन्हा चालू करणे वगैरे. पण ते बेटे मॉडेम माझ्यावर रुसलेलेच राहते आहे हे लक्षात आले. मग जरा वेळ विचार केला व टेलिफोन कंपनीचा हेल्पलाईनचा नंबर शोधून काढला. त्यावर तक्रार केली व आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या लाईनवरच्या ऑपरेटरने माझी अडचण समजावून घेतली व लगेच आपला माणूस आजच्या दिवसात माझ्याकडे येऊन जाईल असे अभिवचन दिले.
मॉडेम चालू नाही म्हणजे आंतरजाल चालू नाही. त्यामुळे ठेवणीतली कामे काढली. दिवसभरात दोन वेळा टेलिफोन कंपनीतून फोन आले आणि अखेरीस संध्याकाळी त्यांचा माणूसही आला. त्याने काही चाचण्या घेतल्या व माझी टेलिफोन लाईन व्यवस्थित आहे पण मॉडेम खराब झाले आहे असा निर्णय दिला. मी मॉडेम भाड्याने घेतलेले असल्याने ते मला बदलून मिळेल पण त्या साठी मला स्वत: टेलिफोन एक्स्चेंज मधे ते घेऊन जावे लागेल असे कळले. नाईलाजाने सोमवारी मी टेलिफोन एक्स्चेंजमधे मोर्चा हलवला.
हे मॉडेम तपासण्याचा विभाग तळमजल्यावर आहे असे लक्षात आल्याने मी तेथे गेलो. दारावर या विभागात काम करणार्यांशिवाय बाकी कोणास प्रवेश करण्यास सक्त मनाई आहे अशी पाटी वाचली व दचकलो. पण तिथेच जायचे आहे हे कन्फर्म झाल्याने आत शिरलो. मी ज्या विभागात शिरलो होतो तो खरे म्हणजे आपल्या सर्वांच्या टेलिफोन लाईन्स किंवा तारा, एक्स्चेंजमधे जिथे आत येतात तो विभाग होता. समोर मोठमोठ्या रॅक्सवर केबल, तारा, यांचे एक अवाढव्य जाळे दिसत होते. या रॅक्सच्या बाजूंना काही टेबले खुर्च्या मांडलेल्या होत्या व त्यावर ब्रॉडबॅन्ड विभाग होता.
मॉडेम बदलून घेणे ही प्रक्रिया तितकीशी सोपी नाही हे माझ्या अनुभवाला आले. माझे मॉडेम खराब आहे हे समजल्यावर या एक्स्चेंजच्या इमारतीच्या मागील बाजूस असणार्या एका शेडमधून मी मॉडेम बदलून आणायचे. परत ते ब्रॉडबॅन्ड विभागातून तपासून घ्यायचे व परत एकदा स्टोअर्समधे जाऊन बदललेले मॉडेम योग्य कार्य करीत आहे हे सांगून ते माझ्या नावावर इशू करून घ्यायचे या सगळ्या सव्यापसव्यात दुपारचे तीन वाजले. घरी आल्यावर बघितले तर बदललेले मॉडेम योग्य कार्य करत नव्हतेच. झाले! पुन्हा एकदा एक्स्चेंज! आता बदललेले मॉडेम परत नीट टेस्ट करून खराब आहे हे त्यांनी मान्य केले. म्हणजे आधी ज्या चाचण्या केल्या त्यात कोणीतरी हलगर्जीपणा केला होता आणि मला त्याची शिक्षा भोगावी लागली होती.
आता नवीनच अडचण समोर उभी राहिली. बदलून देण्यासाठी मॉडेम स्टॉकमधे नाहीत असे मला सांगण्यात आले व दोन दिवसांनी परत एक्स्चेंजमधे यावे असे सांगितले गेले. दोन दिवसांनी म्हणजे काल पुन्हा एकदा परत एक्स्चेंजमधे गेलो. प्रथम अजूनही स्टॉक आलेला नाही असे उत्तर मिळाले. जरा वैतागूनच वरच्या दर्जाच्या अधिकार्याची भेट घेतली. आता मॉडेम उपलब्ध आहे असे एकदम कळले. मग नवीन मॉडेम स्टोअरमधून आणणे ते दुसर्या एका विभागातून तपासून घेणे यात परत बराच वेळ गेला पण अखेरीस मॉडेम आणि आंतरजाल चालू झाले.
या सर्व अनुभवातून जात असताना काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. प्रथम लक्षात आलेली गोष्ट म्हणजे एक्स्चेंजमधला सर्व कर्मचारी वर्ग अतिशय मृदू बोलणारा व शक्य ती मदत करू इच्छिणारा वाटला त्यात तक्रार करण्याजोगे काहीच वाटले नाही. मनाला पटल्या नाहीत त्या इतर दोन गोष्टी. प्रथम म्हणजे ज्या विभागात सतत बाहेरचे ग्राहक आपल्या तक्रारी घेऊन येत असतात तो ब्रॉडबॅन्ड विभाग टेलिफोनच्या तारा जिथे आत येतात त्या सारख्या संबेदनाक्षम ठिकाणी कसा काय ठेवला गेला आहे? ज्यांना समाजद्रोही कारवाया करावयाच्या आहेत त्यांच्यासाठी हे आयतेच कुरण तयार करून ठेवण्याची कल्पना कोणाच्या सुपीक डोक्यातून निघाली असावी? आपण हजाराच्या नोटा वरच्या खिशात सर्वांना दिसतील अशा ठेवल्या तर ते चोराला जसे निमंत्रण होईल त्यातलाच हा प्रकार मला तरी वाटला. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तीन चार वेळा मी त्या एक्स्चेंजमधे गेलो, आतल्या विभागांच्यात गेलो. इमारतीच्या पाठीमागच्या स्टोअर मधे गेलो. एकही सुरक्षा कर्मचारी मला कुठे दिसला नाही. मला कोणी प्रवेशपत्रिका दिली नाही आणि मी येथे का फिरतो आहे? मला काय पाहिजे आहे? हे मला कोणीही विचारले नाही. टॆलिफोन एक्स्चेंजसारख्या संवेदनाक्षम ठिकाणाची सुरक्षा जर आम्ही एवढी गलथान ठेवणार असलो तर समाजकंटक, अतिरेकी यांनी त्याचा फायदा उठवलाच तर नंतर हळहळ व्यक्त करण्याशिवाय दुसरे काय करता येईल?
या आठवड्यातला माझा दुसरा अनुभव एका राष्ट्रीयकृत बॅन्केतला आहे. भारताच्या एका कोपर्यात असलेल्या गावी मला काही पैसे पाठवायचे होते. या बॅंकेच्या पुण्यातल्या शाखेत माझे सेव्हिंग्ज खाते आहे. मला ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे होते त्याचे नाव व खाते क्रमांक सांगितल्याबरोबर संगणकातून ही माहिती बरोबर असल्याचे कन्फर्म झाले. मग मी त्या व्यक्तीच्या नावाने एक चेक लिहिला. आपण बॅन्केत चेक भरताना जशी स्लिप भरतो तशीच एक स्लिप त्या व्यक्तीच्या नावाने मी भरली. काही तासाच्या आत मला त्या व्यक्तीकडून आलेल्या ई-मेलवरून, पैसे जमा झाल्याचा निरोप मिळाला. भारतातून परदेशात किंवा परदेशातून भारतात टेलेग्राफिक ट्रान्सफरने असे पैसे पाठवणे ही काही नवी गोष्ट नव्हे. मी अशा पद्धतीने पैसे पाठवलेले आहेत परंतु भारतातल्या एका कोपर्यात असलेल्या गावाला, जिथे प्रवास करून पुण्याहून जायचे म्हटले तरी चार ते पाच दिवस लागतील, अशा ठिकाणी पाठवलेले पैसे निर्धोक रित्या चार तासात मिळू शकतात ही गोष्ट म्हणजे मला आलेला एक अतिशय सुखद अनुभव आहे यात शंकाच नाही.
ही राष्ट्रीयकृत बॅन्क व टेलिफोन सेवा पुरवणारी या दोन्ही पब्लिक लिमिटेड, परंतु भारत सरकारचे बहुसंख्य शेअर होल्डिंग असलेल्या कंपन्या आहेत. दोन्ही मधला कर्मचारी वर्ग जरी खूप उत्साही नसला तरी एका मर्यादेपर्यंत ग्राहकाला मदत करू नक्कीच इच्छितो. मग एका संस्थेत अतिशय कार्यतत्परता दाखवली जाणे व दुसरीकडे गलथान कारभाराचा उच्चांक गाठला जाणे, हा विरोधाभास का बरे असावा? मला तरी उत्तर मिळत नाहीये.
25 मार्च 2011
समन्वयाचा अभाव हे त्याचे उत्तर.
ReplyDeleteशरयू-
ReplyDeleteप्रतिसादासाठी धन्यवाद