फोटो डास श्पिगेल
पिसाचा प्रसिद्ध मनोरा
शाळेत असताना आपण सर्वांनी हे शिकलेले असते की कोणतीही जड वस्तू, त्या वस्तूच्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी (सेंटर ऑफ मास) मधून काढलेली कोणतेही उभी रेषा (Plumb Line) जर त्या वस्तूच्या जमिनीवरील पायाच्या ठशामधून जात असली तरच स्थिर रित्या जमिनीवर उभी राहू शकते. हा सिद्धांत साधारणपणे क्रमिक पुस्तकातील ज्या पृष्ठावर सांगितलेला असतो, त्याच पृष्ठावर, इटलीमधील पिसा येथील कलत्या मनोर्याचे चित्र हे हमखास छापलेले असतेच. कललेल्या किंवा झुकलेल्या स्थापत्याचे अंतिम मानक म्हणून पिसा मधील हा कलता मनोरा तो बांधला गेल्यापासून प्रचलित आहे. 2001 सालापर्यंत हा मनोरा तब्बल 5.5 अंशांनी झुकलेला होता. या मनोर्याच्या एका बाजूची जमीन खचत चालली आहे हे इटालियन स्थापत्य शास्त्रज्ञांच्या लक्षात आल्यावर आपल्या देशातले हे एक आश्चर्य आपण वेळीच पावले उचलली नाहीत तर कायमचे नष्ट होईल या भूमिकेतून या खचणार्या जमिनीबरोबर मनोरा खचू नये म्हणून त्याला आधार देण्याचे काम सुरू केले गेले. या आधारामुळे मनोर्याचे झुकणे प्रत्यक्षात आता कमी झाले आहे व हा मनोरा आता फक्त 3.99 अंश एवढाच झुकलेला राहिला आहे.पिसाच्या मनोर्याचे झुकणे कमी झाले आहे हे लक्षात आल्याने जगातील सर्वात जास्त प्रमाणात कललेली इमारत म्हणून त्याचे जे उच्चांकी स्थान होते ते आता रद्द करून हे पद जगातील दुसर्या योग्य स्थापत्याला द्यावे असे काही लोकांना वाटते आहे. वायव्य जर्मनीमध्ये नॉर्थ सी जवळ असलेल्या East Frisia या भागात, सुरहाऊसेन (Suurhusen) हे एक छोटे खेडेगाव आहे. या खेडेगावातील चर्चचे पॅस्टर फ्रॅन्क वेसेल्स यांना जगातील सर्वात जास्त कललेले स्थापत्य हा मान आपल्या गावातील चर्चला मिळाला पाहिजे असे वाटते आहे. या चर्चचा 27.31 उंचीचा मनोरा तब्बल 5.19 अंशांनी कललेला आहे.फोटो डास श्पिगेल
सुरहाऊसेन मधला कललेला टॉवर
आपल्या खेडेगावाला हे चर्च बघण्यासाठी म्हणून पार दक्षिण कोरिया व भारत यामधून पर्यटक येत असतात असे हे पॅस्टर सांगतात. गिनीज बूक ऑफ रेकॉर्ड्स साठी आपल्या चर्चची नोंदणी सुद्धा या पॅस्टर साहेबांनी केली असली तरी त्यांना यश मिळण्याची खात्री जरा अंधूकच दिसते आहे कारण पिसा मनोर्याचे कलणे कमी झाले आहे हे समजल्याबरोबर आपल्या गावातली इमारत जगातील सर्वात जास्त कललेली इमारत आहे हे सांगण्याची अहमहमिका सुरू झालेली दिसते आहे.जर्मनीमधल्याच Rhineland-Palatinate या अत्यंत निसर्गरम्य अशा समजल्या जाणार्या राज्यातल्या Dausenau या गावतला टॉवर तब्बल 5.24 अंशांनी कललेला आहे असा या गावाचे मेयर Jürgen Linkenbach यांचा दावा असला तरी गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्स या संस्थेने हा मनोरा म्हणजे स्थापत्य नसून त्याचे भग्न अवशेष आहेत या कारणासाठी मेयरसाहेबांचा दावा फेटाळून लावला. टॉवरच्या आसपास गवत , झाडे झुडपे उगवली आहेत. मात्र पर्यटक येथे येत असल्याने स्थानिक लोकांनी येथे प्रसिद्ध सोअरब्रेड विकण्याचे स्टॉल्स येथे सुरू केले आहेत.
स्वित्झर्लंड मधे स्कीइंग करण्यासाठी जाणारे बरेच पर्यटक सेंट मॉरिट्झ या गावाला भेट देतात. या गावात काही शतके पुराणा असलेला 33 मीटर उंचीचा एक घंटा मनोरा आहे. 100 वर्षांपूर्वी सुद्धा हा मनोरा कललेलाच होता. या मनोर्याचे 5.4 अंश एवढे कलणे कमी व्हावे म्हणून गावातील लोकांनी लोखंडी पाट्या वापरून या मनोर्याला आधार दिला आहे. यामळे आता या मनोर्याचे कलणे 5.04 अंश एवढे कमी झाले आहे. या कामामुळे सेंट मॉरिट्झचा टॉवर या स्पर्धेतून बहुदा बाहेर पडला आहे असे दिसते.
फोटो डास श्पिगेल
मिडलम गावातला मिनी टॉवर
जर्मनी मधल्याच नॉर्थ सी जवळच्या सखल भागात या समुद्र तटावर पाणी सखल असलेल्या जमिनीवर येऊ नये म्हणून बंधारे बांधलेले आहेत. या बंधार्यांजवळ असलेल्या Midlum या गावातील चर्चचा मनोरा 6.74 अंश एवढा कललेला आहे. परंतु हा मनोरा फक्त 14 मीटर एवढाच उंच असल्याने त्याला मनोरा तरी का म्हणायचे असा प्रश्न आहे. लोकांना असे वाटते की जगातील सर्वात जास्त कललेली इमारत हा मान मिळण्यासाठी ती इमारत किती अंशात कललेली आहे ही बाबच फक्त विचारात न घेता त्या इमारतीची उंची सुद्धा लक्षात घेणे जरूरीचे आहे.फोटो डास श्पिगेल
बाड फ्रॅन्केनहाऊसेन मधील टॉवर
असे केले तर eastern German state of Thuringia मधील Bad Frankenhausen या गावामधला 53 मीटर उंचीचा चर्च बेल टॉवर सहजपणे या स्पर्धेत विजयी होऊ शकतो. या टॉवरचा माथा तळापासून 4.45 मीट्रर एवढा बाजूला सरकलेला आहे. येथे उभे राहिले की आपण हवेत उभे आहोत असे वाटू लागते.कोणत्या देशातल्या आणि कोणत्या मनोर्याला हा मान मिळतो हे काही दिवसातच कळेल. पण पिसा येथील मनोर्याला भेट देणार्यांची संख्या काही कमी होईल असे वाटत नाही. कारण या मनोर्याबरोबर गॅलिलिओ आणि त्याचा प्रसिद्ध प्रयोग यांचे नाते जुळलेले आहे. शिवाय पिसा रेल्वे स्टेशन समोर असलेल्या एका छोट्या इटालियन रेस्टॉरंट मधला लाकडे पेटवून भट्टीत भाजलेला गरमागरम पिझ्झा ज्यांनी खाल्ला असेल ते हा पिझ्झा सोडून सॉअरब्रेड खायला थोडेच जाणार आहेत.
22 मे 2011
पिसाच्या मनो-याची हकालपट्टी हे शीर्षक वाचून मी बुचकळ्यात पडलो होतो. म्हणून कामांची यादी डोक्यात किंवा डोक्यावर असूनही हा लेख मी लक्षपूर्वक वाचला. आपण दिलेली माहिती खूपच वेधक आहे. दर वेळी तुमचे किती आभार मानावे असा प्रश्न पडतो. या लेखाचा अखेरचा परिच्छेद नेमके सांगून जातो. पिसाच्या मनो-याचे महत्व कसे कमी होणार नाही, याचा तुम्ही व्यक्त केलेला अंदाज मला पटला.त्याची दाद देण्यासाठी ही प्रतिक्रिया मुद्दाम कळवत आहे.
ReplyDeleteमंगेश नाबर.
Mannab
Deleteप्रतिसादासाठी धन्यवाद
सुंदर शेवटचे कारण नक्कीच आवडले.
ReplyDeleteभोवरा
Deleteप्रतिसादासाठी धन्यवाद